लोकसभा निवडणुकीत अनेक लोकांचा माज उतरला आहे. उद्या मंत्री गिरीश महाजन जरी पक्षातून गेले तरी फरक पडणार नाही. आम्ही मोठे आहोत ते पक्षाच्या भरोशावर आहोत. भाजप पक्ष सोडल्यानंतर सगळ्यांना सगळ्यांची जागा दिसलेली आहे. मी मी म्हणणारे आता कसे बसले आहेत. त्यांची काय अवस्था झाली आहे हे सर्वांनी बघितलं आहे,” असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर नाव न घेता टोला लगावला आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर जळगाव येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने जळगाव लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी समीक्षा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री गिरीश महाजन भाजपचे निरीक्षक, आमदार, खासदार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुककीच्या तयारीला लागण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या. यावेळी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यासह उन्मेष पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत संपूर्ण अकराच्या अकरा विधानसभा मतदारसंघांमधील जागा जिंकण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला आहे. पदाधिकाऱ्यांनी आजपासूनच कामाला लागावे, अशा सूचना बैठकीत मार्गदर्शन करताना नेत्यांच्या वतीने पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या बैठकीत जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर नाव न घेता टीका करण्यात आली.
होय तिकीट मीच नाकारलं होतं
भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावच्या नवनिर्वाचित खासदार स्मिता वाघ यांच्याबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. “2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी स्मिता वाघ यांचं तिकीट मीच नाकारलं होतं, अशी कबुली मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. त्यावेळी मला विजयाबाबत थोडी शंका होती. माझ्याच सांगण्यावरून स्मिता वाघ यांचं तिकीट कापण्यात आलं होतं”, अशी कबुली त्यांनी दिली. जळगावच्या भाजपच्या समीक्षा बैठकीत त्यांनी आपल्या भाषणातून हि कबुली दिली.
‘संकटमोचक लोक उगाच म्हणत नाही’
“खतरो के खिलाडी या पद्धतीने देवाची परवा न करता काम करायचं”, असं गिरीश महाजन म्हणाले. “इर्शालवाडी, अनेक घटनांमधला अनुभव मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितला. अशा पद्धतीने काम केलं तरंच लोक आपल कौतुक करतात आणि म्हणतात नेता पाहिजे तर असा. त्यामुळे आपल्याला संकटमोचक लोक उगाच म्हणत नाही”, असं म्हणत स्वतःला संकटमोचक सांगण्यामागची व्याख्या मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केली.