Maharashtra Assembly Elections : महाराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतणे सर्वाधिक चर्चेत राहात आहेत. पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार – अजित पवार आणि विदर्भात अनिल देशमुख – डॉ. आशिष देशमुख यांची या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा आहे. आता विदर्भातील एका पुतणीने आपल्या काकांना थेट आव्हान दिले आहे. विदर्भात आधी मुलगी आणि वडिलांचा सामना निश्चित झाला. आता काका आणि पुतणी यांच्यात सामना रंगण्याची चिन्ह दिसत आहेत.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. प्रत्येक पक्ष प्रत्येक मतदारसंघासाठी सुक्ष्म नियोजन करत आहे. त्यात भाजपने आघाडी घेतली असली तरी शरद पवार यांनीही अनेक मतदारसंघात साखरपेरणी केली आहे. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. शरद पवार यांनी अनेक मतदारसंघात नवीन चेहऱ्यांना पुढे केले आहे. ही बाब महायुतीसाठी अडचणीची ठरताना दिसत आहे.
राज्यातील अनेक मतदारसंघांत पवारांचा मास्टरस्ट्रोक कुणाचे मोठे नुकसान करतो, हे समोर येईलच. हे गणित पाहून एकेकाळचे शरद पवारांचे खंदे समर्थक व नंतर अजित पवार गटात सामील झालेले सिंदखेड राजा मतदार संघातील आमदार माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी शनिवारी (19 ऑक्टोबर) पुन्हा शरद पवार यांच्या सोबत जाणे पसंद केले. अशात शिंगणेंची पुतणी गायत्री शिंगणे ह्या सध्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. ‘सत्तेसाठी काही पण’ असे ठरवत त्यांनी आपल्या काकाविरुद्ध अनेक गंभीर केले. कुठल्याही परिस्थितीत आपण निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले.
विदर्भातील बऱ्याच मतदारसंघांत मोठा ट्विस्ट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीने मोठा सुरूंग लावण्याची तयारी सुरू केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांच्याविरुद्ध त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम या निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अगोदरच अंबरीशराजे यांनी दंड थोपाटलेले आहेत. आता भाग्यश्री यांनी पण ‘पिक्चर अभी बाकी है’, असाच इशारा दिला आहे.
जिजाऊ माँ साहेबांचं आजोळ असलेल्या सिंदखेड राजा येथेही मोठ्या घडामोडी घडत आहेत. या मतदारसंघात शिंगणे कुटुंबियांचा वरचष्मा आहे. सहकार महर्षी भास्करराव शिंगणे आणि त्यांच्यानंतर डॉ. राजेंद्र शिंगणे यांना या मतदारसंघाने साथ दिली आहे. पण यंदा शिंगणे कुटुंबातच विधानसभेचा सामना रंगणार आहे. डॉ. शिंगणे यांच्याविरोधात पुतणी गायत्री शिंगणे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मतदार संघात हवा बदल
सिंदखेड राजा मतदारसंघात आता बदल पाहिजे. मागील 25 वर्षात विकास कुठेच दिसत नाही. डॉ. शिंगणे यांनी विकासाची पाच कामे तरी दाखवावीत. त्यांनी एक रुपयाचाही विकास केला नाही. भूमिपूजन करणे, नारळ फोडणे, येवढेच काम त्यांनी केले. निवडणूक आलीं की डॉक्टर शिंगणे रडतात आणि भास्करराव शिंगणे यांचे नावाने मते मागतात, अशी खरमरीत टीका गायत्री शिंगणे यांनी काकांवर यापूर्वी केली आहे.
Assembly Election : ‘काकांचा’ पुतण्याला आणखी मोठा धक्का, दादा गटाला खिंडार !
वडिलांचे नावाने किंवा आजोबांचे नाव मत मागण्याचा माझा गुण नाही. तुमच्या वडिलांनी ज्या गोष्टी केल्या त्या तुम्ही बंद पाडल्या. त्यांनी 100 टक्के फसवणूक केली आहे. प्रतिसाद नसल्याने त्यांची मानसिकता बिघडली आहे. मला जनतेचा प्रतिसाद मिळतो आहे. इतर मतदारसंघ 25 वर्षात सुधारले. मग सिंदखेड राजा मतदारसंघ का नाही सुधारला, असा सवालही त्यांनी केला.
मला तिकीट मिळणारच
ज्या माणसाला वाटत असेल की तुतारी हाती घेऊन त्यांना फायदा मिळेल, तर त्यांनी ही गोष्ट डोक्यातून काढून टाकयला हवी. शरद पवारांनी डॉ. शिंगणे यांना माफ केले असेल. पण इथली जनता तुम्हाला कदापि माफ करणार नाही. सिंदखेडराजाची जनता तुम्हाला येत्या निवडणुकीत साथ देणार नाही. तुम्ही ना पक्षासाठी एकनिष्ठ होते ना कुटुंबियांसाठी, ना जनतेसाठी, असा जोरदार प्रहार गायत्री शिंगणे यांनी काका राजेंद्र शिंगणे यांच्यावर केला आहे.
आपली शरद पवार यांची भेट झाली. त्यांच्याशी चर्चा झाली. कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. मी त्यांच्याकडे तिकीटाची मागणी केली आहे आणि शरद पवार हे मला तिकीट देतीलच, असा विश्वास गायत्री यांनी व्यक्त केला. या मतदारसंघात भास्करराव शिंगणे आणि शरद पवार यांचे नाव आहे. त्यामुळे आपण शंभर टक्के निवडून येणार, असा दावा त्यांनी केला. दरम्यान राजेंद्र शिगणे शनिवारी (19 ऑक्टोबर) तुतारी हातात घेऊन शरद पवार यांच्या गटात सामील झाले. अशात पक्षाचे तिकीट मिळाले नाही तर आपण अपक्ष लढणार असल्याचे पुतणी गायत्री शिंगणे यांनी सांगितले.
बंडखोरीचा इशारा
राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे यांनी नुकतीत शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली होती. यासोबतच राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी दिल्यास बंड करण्याची घोषणादेखील त्यांनी केली. त्यामुळे राजेश शिंगणे यांच्या पक्षप्रवेशानंतर शरद पवार गटातही नाराजीनाट्य घडणार, हे आता स्पष्टपणे दिसत आहे.