Ujjwal Nikam : आतापर्यंत आपण पाहिले असेल की, पोलिस आणि वकील गुंडांच्या विरोधात कोर्टात जातात. परंतू, महाराष्ट्रात असा प्रकार घडला आहे की, गँगस्टरच सरकारी वकिलाच्या विरोधात न्यायालयात गेला आहे. राज्यातील कुख्यात गुंड, विविध हत्याकांडातील आरोपी विजय पलांडे याने सरकारी वकीला विरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे. या वकिलाला माझ्या खटल्यातून काढून टाका अशी मागणी पलांडे याने रेटून धरली आहे. हे वकील दुसरे कोणी नसून सतत प्रसिद्धीत राहणारे उज्ज्वल निकम आहेत.
https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35
विजय पलांडे याने उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून खटल्यात नियुक्ती करण्यास विरोध दर्शविला आहे. पलांडेने 24 जून रोजी न्यायालयात धाव घेतली व उज्ज्वल निकम यांना त्याच्या खटल्यातून काढून टाकण्याची विनंती केली आहे. उज्ज्वल निकम यांची माझ्या खटल्यातील नियुक्ती चुकीच्या हेतूने करण्यात आली आहे, असा दावाही पालांडेने केला आहे.
देशाची राजधानी दिल्ली येथील व्यापारी अरुण टिक्कू आणि चित्रपट निर्माते करण कुमार कक्कड यांच्या हत्येप्रकरणी अटक झाल्यानंतर एप्रिल 2012 पासून विजय पलांडे न्यायालयीन कोठडीत आहे. लहान काळातील अभिनेता अनुज टिक्कूचे वडील दिल्लीस्थित व्यापारी अरुण टिक्कु यांच्या हत्येप्रकरणी पलांडेला अटक करण्यात आली होती. पोलिसांना नंतर कळले की करण कुमार कक्कडच्या बेपत्ता होण्यात पलांडेचा सहभाग होता. करण कुमार कक्कडच्या कुटुंबीयांनी त्याच्या बेपत्ता होण्यात, पलांडेचा सहभाग असल्याचा दावा करीत पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.
त्यांच्या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण आता पलांडे याने त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे.
गँगस्टरचा आक्षेप
विजय पलांडे यांच्या विरुद्धच्या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम न्यायालयात हजर झाले होते. त्यावर पलांडेंनी न्यायालयाचे दार ठोठावले व आक्षेप घेतला. उज्ज्वल निकम राजकीय पक्षाच्या अजेंड्यासाठी काम करतील. हाय-प्रोफाइल केसेसमध्ये खोट्या शिक्षा मिळवून देण्यासाठी ते कोणतीही हद्द पार करू शकतात. ही गोष्ट आरोपींच्या मूलभूत अधिकारांच्या विरोधात आहे. निकम या माध्यमातून जनतेमध्ये भाजपची प्रतिमा निर्मिती करू शकतात, असा दावाही विजय पलांडे यांनी याचिकेत केला आहे.
होणार सुनावणी
विजय पलांडे यांनी न्यायालयाकडे न्याय आणि मूलभूत अधिकारांच्या हितासाठी उज्ज्वल निकम यांना त्याच्या विरोधातील खटल्यापासून दूर ठेवण्याचे निर्देश देण्याची विनंती केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 28 जून रोजी होणार आहे.
लढवली होती निवडणूक
मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून उज्ज्वल निकम यांनी भाजपचे तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. परंतु काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी 16 हजार पेक्षा जास्त मताधिक्य प्राप्त करून निकम यांचा पराभव केला.
Jayant Patil : अपक्षांनाही ‘तुतारी’मुळे राष्ट्रवादीचे नुकसान
तत्कालीन खासदार पूनम महाजन यांचे तिकीट कापत भाजपने उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली होती. पण या निर्णयाचा भाजपला कोणताही फायदा झाला नाही. उज्ज्वल निकम यांनी मुंबई येथील हॉटेल ताज दहशतवादी हल्ल्या सारख्या अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांमध्ये सरकारी वकील म्हणून न्यायालयात सरकारचे प्रतिनिधित्व केले आहे.