Crime Under POSCO Act : देशासह राज्यभरात महिला अत्याचाराची प्रकरणे गाजत आहेत. अशात अकोल्यातील जुने शहर भागात सामूहिक बलात्काराचे एक खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे. यात बर्थ-डे पार्टीत सहभागी झालेल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या मुलीला सॉफ्टड्रिंकमधून गुंगीचे औषध देण्यात आले. विशेष म्हणजे या बलात्कारासाठी एका मुलीनेच तरुणांना मदत केली आहे.
जुने शहर पोलिसांनी याप्रकरणी बंटी सटवाले, लल्ला इंगळे यांच्यासह एका अज्ञात तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. अज्ञात आरोपीचे नाव चिक्की असल्याचे सांगण्यात येत आहे. तीनही आरोपी फरार असून बलात्कारासाठी मदत करणाऱ्या मैत्रिणीला पोलिसांनी अटक केली आहे. सर्व आरोपी जुने शहरातील राहणारे आहेत. यासंदर्भातील माहिती जुने शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक नितीन लेव्हरकर यांनी दिली.
सुनियोजित कट?
जळगाव जिल्ह्यातील एक 15 वर्षीय बालिका आपल्या चुलत मावशीकडे आली होती. अकोला येथे शिक्षण घेण्याच्या निमित्ताने ती मुक्कामी आहे. पीडित बालिका दहावीत शिकते. अकोल्यातील पायल नावाच्या मुलीशी तिची मैत्री झाली. पायलने पीडित मुलीची भेट बंटी सटवाले नावाच्या तरूणाशी करून दिली. याशिवाय पायलने आपल्या चुलत मामीशी देखील बंटीची ओळख करून दिली. पीडित मुलीलाही पायलने आपल्या चुलत मामीला भेटविले. मात्र पायलशी केलेल्या मैत्रीनेच मुलीचा घात केला.
पायलने पीडित मुलीला आपल्या काही मित्रांनाही भेटविले. त्यानंतर पायलच्या चुलत मामीचा नवरा लल्ला इंगळे याने पीडित मुलीला वाढदिवस साजरा करण्यासाठी पार्टीला येण्यास सांगितले. रात्री उशिरा वाढदिवस साजरा करायचा असल्याने उशिरापर्यंत थांबावे लागले असे पीडित मुलीला सांगण्यात आले. त्यामुळे पीडित मुलगी पायलसोबत निघाली. पायलने तिला आपल्या चुलत मामीच्या घरी नेले. मामीच्या घरी लल्ला इंगळे आणि बंटी सटवाले यांनी मद्यप्राशन केले. त्यानंतर पीडित मुलीला बळजबरीने सॉफ्टड्रिंक पाजले. या सॉफ्टड्रिंगमध्ये गुंगीचे औषध होते. मुलीला नशा चढल्यानंतर बंटी आणि लल्लाने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आणखी एकाने या मुलीवर बलात्कार केला.
Yavatmal Police : याचिकाकर्ते पोलिस सुरक्षेत भाजी घ्यायला जातात
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
पायलच्या चुलत मामीकडे हा प्रकार घडला. या सर्व घटनेची व्हिडीओ पायल आणि तिच्या मित्रांनी तयार केला. त्यानंतर त्यांनी पीडित मुलीला त्यांनी ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या मुलीला देहविक्री करण्यास व अन्य मुलांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी बळजबरी करण्यात येत होती. तसे न केल्यास व्हिडीओ सर्वत्र व्हायरल करण्याची धमकी देण्यात येत होती. वारंवार पीडित मुलीला फोनवरून यासाठी तगादा लावण्यात आला. सुरुवातीला पीडित मुलगी घाबरली. परंतु त्यानंतर तिने हा प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितला. अखेर नातेवाईकांनी जुने शहर पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये (POSCO Act) पायल, बंटी सटवाले, लल्ला इंगळे व चिक्की याच्या विरोधात गुन्हा नोंदविला.
पीडित बालिका पोलिसांत गेल्याची माहिती मिळताच बंटी सटवाले, लल्ला इंगळे आणि चिक्की हे तिघेही फरार झालेत. मात्र पायल पोलिसांच्या हाती सापडली. पोलिसांनी तातडीने पायलला अटक केली. गुरुवारी (ता. 27) तिला न्यायालयासमक्ष हजर करण्यात आले. कोर्टाने तिला पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पायल, बंटी सटवाले, लल्ला इंगळे आणि चिक्की यांनी आणखी असे काही प्रकार केले आहेत काय, याचा शोध पोलिस घेत आहेत. याशिवाय असा प्रकार करीत मुलींना देहविक्रीच्या व्यवसायात ओढण्याचा प्रकार सुरू होता काय, याचा तपासही जुने शहर पोलिस करीत आहेत.