Political Battle 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तसाच शिल्लक आहेत. अशात सट्टा बाजार तेजीत आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे भंडारा जिल्ह्यात एकट्या तुमसरमध्ये अडीच कोटींचा सट्टा लागला असल्याची माहिती पुढे आली आहे.लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी भंडारा-गोंदिया मध्ये मतदान झाले. मंगळवार, 4 जूनला सकाळी 8 वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
सट्टा बाजारही तेजीत आहे. कुबेरनगरी म्हणून ओळख असलेल्या तुमसर शहरात लागलेला अडीच कोटींचा सट्टा ही पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे, भंडारा-गोंदियातील लढत तुल्यबळ आहे. त्यामुळे सट्टा बाजारात काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांचा सारखाच दर मिळत आहे. मात्र सट्टा बाजारात काँग्रेसचे पारडे जड असल्याचे जाणकार सांगतात.
रेकॉर्डब्रेक उलाढाल
तुमसर शहर व तालुक्यात या वेळेला रेकॉर्ड ब्रेक प्रमाणात सट्टा लागला आहे. काहींनी तुमसर विधानसभा मतदारसंघात कोणता पक्ष समोर राहील यावरही पैज लावली आहे. गावखेड्यात हौस म्हणून युवकांनीही मोठ्या प्रमाणात पैज लावल्याची माहिती आहे. भाजपने दुसऱ्यांदा सुनील मेंढे यांच्यावरच विश्वास दाखविला. त्यांना तिकीट दिले आहे. दुसरीकडे काँग्रेसने नवखे उमेदवार मानले जाणारे डॉ. प्रशांत पडोळे यांना तिकीट दिले. दोघांकडूनही निवडून येण्याच्या दावा होत आहे.
आता चुरस वाढली आहे. मंगळवारी (4 जून) मतदार कुणाच्या पदरात विजयाचे दान टाकणार, विजयाचा गुलाल उधळण्याची संधी कुणाला देणार, याचीच चर्चा आणि उत्सुकता सर्वत्र आहे. दुसरीकडे मतमोजणीच्या दृष्टीने प्रशासनाच्यावतीने तयारी पूर्ण झाली आहे.
Bhandara Industry : राजकीय उदासीनतेने हरपले समृद्ध तालुक्यांचे वैभव
पलाडी परिसरात स्ट्रॉगरूममध्ये मतदान यंत्र सुरक्षित आहेत. मतमोजणीच्या दिवशी उमेदवार आणि निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत या कक्षाचे सील उघडले जाईल. त्यानंतर मतदान यंत्र बाहेर काढून याच ठिकाणी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी दोन हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहेत. पोलिसांचा तगडा बंदोबस्तही तैनात आहे.