Mihan : नागपूरमध्ये मिहान निर्माण व्हावे यासाठी आम्ही आग्रही होतो. पण सर्वपक्षातील नेत्यांनी त्याला खूप विरोध केला. विरोध करणाऱ्यांमध्ये शरद पवारही होते आणि आज त्याच मिहानमध्ये ६८ हजार तरुणांना रोजगार मिळाला आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. गिरीश कुबेर यांच्या ‘मेड इन चायना’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
गडकरी म्हणाले, ‘मिहानमध्ये आज देशातील जवळपास सर्वच मोठ्या कंपन्या येत आहेत. अनेक मोठ्या कंपन्यांनी रोजगार निर्माण केला आहे. आतापर्यंत ६८ हजार तरुणांना मिहानमध्ये रोजगार मिळाला. भविष्यातही मोठी गुंतवणुक होणार आहे.’
गडकरी म्हणाले, ‘कॅपिटल इव्हेस्टमेंट वाढेल तर रोजगार निर्माण होईल. रोजगार निर्माण झाला तर गरिबी दूर होईल. आपल्याकडे कुठलाही मोठा उद्योग आला की त्याला विरोध करायला लोक तयारच असतात. ज्याच्याकडे पैसा आहे तोच गुंतवणुक करणार आहे. गुंतवणुक होईल तर त्यातून अर्थव्यवस्था बळकट होईल.’
रिफायनरीला होणाऱ्या विरोधाबद्दलही ते बोलले. ‘कोकणाचे उदाहरण ताजे आहे. तिथे रिफायनरीला विरोध झाला. अश्याप्रकारे विरोध केल्याने गुंतवणुक होणार नाही. मी राज्यात मंत्री असताना बीओटी (बांधा वापरा हस्तांतरीत करा) धोरण आणले. त्याला जयंत पाटील यांच्यासह सर्वच विरोधकांनी विरोध केला. त्यावेळी माझ्यावर खूप टीका झाली. सरकारच बिओटीवर चालविण्याचा सल्ला आम्हाला दिला. आज तेच लोक बीओटीवर रस्ते बांधून मागत आहेत,’ असेही ते म्हणाले.
आपली मानसिकता बदलावी लागेल
तंत्रज्ञान, उत्पादन निर्मिती यामध्ये चीन खूप पुढे आले. आपण स्पर्धा करू शकत नाही असे नाही. पण चीनने राष्ट्रहितासाठी समाजवाद, माओवाद, पुंजीवाद वगैरे बाजुला ठेवले. आज चीनमध्ये लाल झेंडे दिसतात, कम्युनिस्ट पार्टी दिसणार नाहीत. राष्ट्रहितापुढे त्यांनी या सर्व गोष्टींना महत्त्व दिले नाही. आपणही आपली मानसिकता विकासाभिमुख, रोजगाराभिमुख, तंत्रज्ञानाभिमुख तयार केली पाहिजे, असेही गडकरी म्हणाले.
Government Schemes : एक माणूस हरवला; सरकारी जाहिरातीत सापडला!
शेवटी अदानीलाच पोर्ट मिळाले
कोचिनमध्ये पोर्ट अलॉट करायचे होते. अदानीने टेंडर भरले. तिथे काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टीने विरोध केला. मी म्हणालो रद्द करा. दुसरे टेंडर काढा. तर म्हणाले ‘तीनवेळा टेंडर काढले कुणीच आले नाही.’ भारत सरकार यावर २० टक्के सबसिडी देईल, पोर्ट इकॉनॉमिकली व्हायबल नाही आणि कुणी यायला तयार नाही. त्यांना म्हणालो, तुम्हाला मुलाचं लग्न करायचं आहे आणि कुणी लग्नाला तयार नाही. मग जी मिळेल तिच्या गळ्यात माळ घाला आणि विषय संपवा. आम्हाला अदानीमध्ये रस नाही. तुम्हाला करायचे नसेल तर सोडून द्या, असे सांगितले. शेवटी त्यांनी अदानीलाच पोर्ट अलॉट केले. कारण ज्याच्याकडे पैसा असेल तोच गुंतवणुक करेल, हे सत्य नाकारता येणार नाही, असे गडकरी यांनी सांगितले.