Hingna constituency : गेल्या दहा वर्षांमध्ये हिंगणा मतदारसंघात आठ हजार कोटी रुपयांची कामे झाली. पुढील दोन महिन्यांमध्ये एक हजार कोटी रुपयांची नवीन कामे सुरू होतील. हिंगण्यातच नव्हे तर संपूर्ण देशात खेडोपाडी पोहोचणारे उत्तम रस्ते निर्माण झाले. पण साठ वर्षे सत्तेत असूनही काँग्रेसला गावांमध्ये जाणारे रस्तेही बांधता आले नाहीत, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
जाहीर सभा
हिंगणा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार समीर मेघे यांच्या प्रचारार्थ टाकळघाट आणि बुटीबोरी येथे गडकरींच्या जाहीर सभा झाल्या. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘काँग्रेसने केवळ सत्ता उपभोगली. गावांमध्ये जाणारे रस्ते बांधण्याकडे त्यांनी लक्षही दिलं नाही. देशात अटलजींच्या नेतृत्वातील सरकार असताना प्रधानमंत्री ग्राम सडक योजना राबविण्यात आली. खेडोपाडी रस्ते पोहोचले. या योजनेचा भाग असणे माझ्यासाठी नशिबाची बाब होती.’
आमच्यावर संविधान बदलाचे आरोप झाले. पण आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींनी संविधानाची पायमल्ली केली. संविधान तोडण्याचे पाप काँग्रेसचे आहे. पण उलटा चोर कोतवाल को डाटे, अशी परिस्थिती आहे. बाबासाहेबांचे संविधान बदलणार असल्याचा प्रचार आमच्याविरोधात केला. पण आमच्यावर जाती-पातीचे राजकारण करण्याचे संस्कार नाहीत. जातीयवादाचे वीष पसरविण्याचे काम काँग्रेसने केले. संविधान कधीही बदलणार नाही आणि बदलू देणार नाही, याचा विश्वास मी तुम्हाला देतो, असेही गडकरी म्हणाले.
कोरोना काळात मोठे योगदान
दत्ताभाऊ मेघे आणि समीर यांनी खूप मोठे काम केले आहे. दोघांनाही विनंती करायचो की हिंगण्याला मोठे मेडिकल कॉलेज सुरू करा. एकदिवस त्यांनी निर्णय घेतला आणि पुढे कोरोना काळात त्याच मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून लोकांची सेवा केली. हजारो गोरगरिबांचे प्राण वाचविण्याचे काम केले. त्याचे श्रेय समीर मेघे यांना आहे, या शब्दांत ना. श्री. गडकरी यांनी कौतुक केले.
Assembly Election : गडकरींनी कुणाला दिला आराम करण्याचा सल्ला?
खुशखबर..
गडकरी म्हणाले, ‘बुटीबोरी परिसरात मोठ्या प्रमाणात उद्योग आले. इंटरनॅशनल लॉ स्कुल, ट्रिपल आयआयटी आले. चार हजार कोटी रुपयांचा रिंग रोड पूर्ण झाला. या भागाचा नव्याने विकास होत आहे. मिहानचे क्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न आहे. उत्तम रस्ते झाले. या भागात आंतरराष्ट्रीय दर्जाचे बर्ड पार्क झाले. बुटीबोरीला साडेचारशे कोटींचा मदर डेअरीचा प्लान्ट सुरू होणार आहे. पुढील दोन वर्षांत बुटीबोरीला मेट्रो पोहोचणार आहे.’