महाराष्ट्र

Nitin Gadkari : राजकारण हा पैसे कमावण्याचा धंदा नाही

Hingna : गडकरींनी सुनावले; काँग्रेसने जातीयवादाचं विष पेरलं

Assembly Election : काँग्रेसच्या धोरणांनी जातीयवादाचं विष पेरलं. मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलणार असल्याचं खोटं सांगितलं. त्याच काँग्रेसने साठ वर्षे फक्त गरिबी हटावोचा नारा दिला आणि दुसरीकडे स्वतःच्या नेत्यांना मोठं केलं. आम्ही आमदार-मंत्री बनण्यासाठी राजकारणात आलो नाही. राजकारण हा आमच्यासाठी पैसे कमावण्याचा धंधा नाही, या शब्दांत केंद्रीय मंत्री गडकरींनी सुनावले.

हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार समीर मेघे यांच्या प्रचारार्थ गडकरींची सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. या समाजातील अस्पृश्यता समूळ नष्ट करून सामाजिक आणि आर्थिक समतेच्या आधारावर समाजाची रचना झाली पाहिजे हेच आमचे उद्दिष्ट आहे. राष्ट्रवाद, सुसाशन आणि अंत्योदय या तीन तत्वांचे आमच्यावर संस्कार झाले आहेत. आम्ही आमदार-मंत्री बनण्यासाठी राजकारणात आलेलो नाही. आमच्यासाठी राजकारण हा पैसे कमावण्याचा धंदा नाही, असंही गडकरी म्हणाले.

अशी झाली सुविधा..

पूर्वी हिंगणा तालुका नागपूरपासून वेगळा समजला जायचा. या भागातील रस्ते चांगले नव्हते. पायाभूत सोयीसुविधांची वाणवा होती. मात्र गेल्या दहा वर्षांमध्ये हिंगण्याचा विकास झाला आहे. नागपूर शहराशी कनेक्टिव्हिटी वाढली आहे. आता नागपूरची सॅटेलाईट सिटी म्हणून हिंगण्याची ओळख निर्माण झाली आहे. ती अधिक ठळक करून खरा विकास साधण्यासाठी महायुतीला निवडून द्या, असं आवाहन गडकरींनी केलं.

‘लवकरच हिंगण्यामध्ये रिंगरोडवरून ट्रॉली बस पोहोचणार आहे. दोन वर्षांच्या आत हिंगण्यामध्ये मेट्रो दाखल होणार आहे. मिहान प्रकल्पात आतापर्यंत 88 हजार तरुणांना रोजगार मिळाला आहे. पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येऊ द्या; पुढच्या काळात दोन लाख तरुणांना रोजगार मिळेल, असा विश्वास देतो.’ देशाचा विकास करण्यासाठी कृषी आणि उद्योग या दोन क्षेत्रांचा विकास महत्त्वाचा आहे, असे त्यांनी नमूद केले.

रशियाचे आर्थिक मॉडेल

‘ज्याठिकाणी पायाभूत सुविधा म्हणजेच पाणी, वीज, दळणवळण आणि संपर्क विकसित होतात त्याच ठिकाणी उद्योग वाढतो. ज्या ठिकाणी पाणी, उत्तम बीज-कलमा, योग्य भाव आणि कृषी आधारित प्रक्रिया उद्योग निर्माण होतात. तेथे शेतीचा आणि पर्यायाने गावांचा विकास होतो. पण काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर रशियाचे आर्थिक मॉडेल भारतात उतरवले. उत्तम रस्ते, शेतीला सिंचनाची सोय, उत्तम शाळा, सुसज्ज आरोग्य यंत्रणा गावांमध्ये पोहोचली असती तर लाखो लोकांना गाव सोडून शहरांमध्ये जाण्याची गरज पडली नसती,’ असे ते म्हणाले.

Assembly Election : विमान हवेत असताना गडकरींसोबत काय घडले?

काँग्रेसने गावांकडे दुर्लक्ष केलं

‘काँग्रेसच्या काळात चांगले रस्ते झाले नाहीत. प्यायला शुद्ध पाणी मिळाले नाही. आरोग्य यंत्रणा कोलमडली होती. गावांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले होते. गावांमधून ३० ते ३५ टक्के लोक गाव सोडून शहरात गेले. शहरातील झोपडपट्ट्या वाढल्या. पण गेल्या दहा वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने मोठ्या प्रमाणात काम केले. प्रत्येक क्षेत्रात गुंतवणूक केली. आज देशाचे चित्र बदलले आहे. गावांमधीलपरिस्थिती बदलली आहे.’

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!