Tension In Akola : अकोल्यातील मनसे कार्यकर्ता जय मालोकार यांच्यावर जिल्ह्यातील निंबी मालोकार या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अंत्यसंस्काराला मनसेचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मनसे प्रदेश सरचिटणीस राजू उंबरकार, प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकार हे देखील अंत्ययात्रेला उपस्थित होते. जय यांच्या परिवाराला भेटण्यासाठी राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे अकोल्यात येण्याची शक्यता आहे. प्रदेश सरचिटणीस राजू उंबरकार, प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकार यांनी ही माहिती दिली.
जय मालोकार यांच्या कुटुंबीयांच्या पाठशी मनसे उभी आहे. पुढची भूमिका काय असले यावर नंतर बोलत येईल असे, राजू उंबरकार म्हणाले. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. मनसेने त्यांच्या गाडीची तोडफोड केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर झालेल्या राड्यात जय मालोकार देखील सहभागी होते. राड्या झालेल्या झटापटीत मालोकार यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांची छाती दुखू लागली. सहकाऱ्यांनी त्यांना अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांना हार्टअटॅक आला होता. उपचारादरम्यान जय यांचा मृत्यू झाला.
गावात शोककळा
जय यांच्या मृत्युमुळे निंबी मालोकार गाव शोकसागरात बुडाले आहे. जय यांच्या मृत्युची वार्ता कळताच खासगी दवाखान्यातही गर्दी वाढली. एकीकडे सिव्हिल लाइन्स पोलिस अमोल मिटकरी यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल करीत होते. तिकडे जय मालोकार यांनी अखेरचा श्वास घेतला होता. याबाबत पोलिसांना कळताच त्यांनी मिटकरी यांचे घर आणि हॉस्पिटलच्या परिसरात बंदोबस्त तैनात केला. बुधवारी (ता. 31) जय यांच्या पार्थिवावर निंबी मालोकार येथे अंत्यसंस्कार करण्यात आलेत. जय मालोकार मनसेच्या विद्यार्थी आघाडीचा अकोला जिल्हा उपाध्यक्ष होते. अकोल्यातील उमरी भागात त्यांचे वास्तव्य होते, तरी अंत्यसंस्कार निंबी मालोकार येथेच करण्यात आलेत.
जय याचा मृतदेह पाहताच त्यांच्या आईने टाहो फोडला. आंदोलनापायी पोटचं पोरगं गेलं, असे म्हणत त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. 24 वर्षांच्या मुलाचा देह पांढऱ्या कपडात गुंडालेला पाहून जयचे नातेवाईकर आक्रोश करीत होते. त्यामुळे वातावरण भावूक, शोकाकुल आणि संतप्तही झाले होते. जय मालोकार मृत्युंप्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व दोषींवर कारवाई करण्याची मागणी संतप्त नातेवाईकांनी केली.
मिटकरी यांच्या वाहनाच्या तोडफोडीदरम्यान झटापटीमध्ये जय मालोकारला जबर धक्का बसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. जय मालोकार यांचे होमिओपॅथीच्या तृतीय वर्षाचे शिक्षण सुरू होते. पाच वर्षांपूर्वी जय आवड असल्याने राजकारणात आले. त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्षपद मिळाले. मुलगा मोठा होईल, डॉक्टर बनेल हे त्यांच्या पालकांचे स्वप्न आता भंगले आहे.