महाराष्ट्र

BJP Politics : काय सांगता..! माजी केंद्रीय मंत्री ग्रामपंचायत निवडणूक लढवणार

Raosaheb Danve : लोकसभेतील पराभवानंतर प्रतिक्रीया : राज्यसभा, विधानपरिषद मागणार नाही

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला चांगलाच हादरा बसला. यात सर्वात मोठा धक्का म्हणजे जालना आणि बीड मधील मानला जातो. बीडमध्ये पंकजा मुंडे तर जालन्यात माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला. मराठवड्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने भाजपाला तडीस नेले. जालन्यातूनच मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची सुरूवात झाली आणि इथेच भाजपला जोरदार धक्का बसला. 

जालनामधून मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षण आंदोलन सुरु झाले आणि याच ठिकाणी भाजपाला सर्वात मोठा हादरा बसला. यावर आता रावसाहेब दानवे यांनी आपण राज्यसभा मागणार नाही, विधानपरिषद मागणार नाही, विधानसभा लढविणार नाही. मात्र पक्षाने संधी दिल्यास मी ग्रामपंचायत निवडणूक देखील लढवेल, अशी प्रतिक्रीया दिली आहे. त्यामुळे आता दानवेंच्या या प्रतिक्रीयेचे अर्थ काढले जात आहेत. लोकसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर भाजपाचे महाराष्ट्रभर चिंतन बैठकीचे आयोजन सुरु आहे. याच अनुषंगाने माजी रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे संपूर्ण मराठवाड्यात फिरून कार्यकर्त्यांसोबत चिंतन बैठक घेत आहेत. दरम्यान त्यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला.

दिशा पाहून सत्तारांबाबत निर्णय

अब्दुल सत्तार नेमके कोणत्या दिशेने तोंड करून उभे राहतात, त्यावर त्यांना विधानसभेला निवडून आणायचे की पाडायचे ? हे ठरवणार असल्याचे वक्तव्य देखील माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. मी नेहमीप्रमाणे पूर्वेला देवदर्शनासाठी उभा राहतो आणि देवदर्शन घेतो. ते नेहमी पश्चिमेला तोंड करून उभे राहतात ते जर पूर्वेला आमच्या बाजूला तोंड करून उभे राहिले. आणि मला आदेश आला तर मी त्यांचा प्रचार करेन. ते जर पश्चिमेला तोंड करून उभे राहिले तर विरोधात प्रचार करेल. मात्र ते कोणती भूमिका घेतात यावरुन निर्णय घेणार असल्याचे दानवे यांनी सांगितले.

सरपंच ते मंत्री : दानवेंचा रंजक प्रवास

रावसाहेब दानवे यांचा 30 वर्षांचा राजकीय प्रवास अत्यंत रंजक आहे. त्यांनी गावच्या सरपंचपदापासून ते केंद्रीय मंत्री अशी वाटचाल केली आहे. ते दोनदा भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. 1999 साली त्यांनी पहिल्यांदा जालना लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली आणि जिंकली. सलग 5 वेळा लोकसभेत जालन्याचे प्रतिनिधित्व केले. संसदेच्या विविध समित्यांवर त्यांनी काम केले. 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली. मात्र, एकनाथ खडसे यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राजीनामा दिल्याने नऊ महिन्यांतच ते महाराष्ट्रात परतले. त्यानंतर दानवे यांच्याकडे भाजपचे प्रदेशाध्यक्षपद सोपवण्यात आले होते. 2019 मध्ये पुन्हा एकदा रावसाहेब दानवे यांची मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली. मात्र 2024 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!