Bitterness In Family Relation : विधानसभा निवडणुकीच्या घोषणेची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतशी इच्छुकांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले. त्यामुळे काँग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी जास्त आहे. वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघातही दिग्गज रिंगणात उतरणार आहेत. त्यात आपण निवडणूक लढणारच, अशी गर्जना भद्रावती नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी केली आहे. काँग्रेसच्या उमेदवारीवर अधिकार आहे. काँग्रेसने उमेदवारी दिली तर ठिक, अन्यथा सर्व पर्याय खुले आहेत. अनिल धानोरकर यांनी हे सांगत दंड थोपटले आहे.
अनिल धानोरकर यांच्या गर्जनेमुळे काँगेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या घरातच निवडणुकीमुळे सुंदोपसुंदी पाहायला मिळ आहे. खासदार प्रतिभा धानोरकर या स्वतःचे भाऊ प्रवीण काकडे यांच्यासाठी प्रयत्नशील आहेत. धानोरकर यांसाठी हा भविष्यातील राजकीय रणनीतीचा भाग आहे. वरोरा-भद्रावती विधानसभा मदतारसंघातून वरोरा नगर परिषदेचे अध्यक्ष अहेतेशाम अली हे सुद्धा इच्छुक आहेत. काँग्रेसकडून अल्पसंख्यांक चेहरा म्हणून त्यांचे नाव समोर येत आहे. याबाबतीत चाचपणी सुरू आहे. अशातच अनिल धानोरकर यांची निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.
अटीतटीचा सामना
वरोरा विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुकांची संख्या पाहता अटीतटीचा सामना होणार आहे. हेच चित्र सध्या स्पष्टपणे दिसत आहे. अनिल धानोरकर शिवसेनेच्या माध्यमातून भद्रावती नगर परिषदेमध्ये तब्बल तीन टर्म कार्यरत होते. ते नगराध्यक्ष व उपाध्यक्ष होते. अनिल धानोरकर शिवसेनेचे (Shiv Sena) माजी जिल्हा प्रमुख सुद्धा होते. अनिल धानोरकर दिवंगत माजी खासदार बाळू धानोरकर यांच्याच तालमीत तयार झाले. आता त्यांनाही आमदारकीचे वेध लागले आहेत. काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोकर यांच्या परिवारातील ते आहेत. अशातच मतदारसंघ काँग्रेसकडेच राहावा, असा खासदार धानोरकर यांचा प्रयत्न आहे. पण त्यांचा हा प्रयत्न भावासाठी सुरू आहे.
खासदार धानोरकर यांच्या प्रयत्नामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाची नाकाबंदी झाली आहे. निवडणुकीमध्ये उमेदवारी मागण्याचा प्रत्येकालाच अधिकार असतो. विविध पक्ष आपले उमेदवार रिंगणात उतरवितात. यात वरोरा विधानसभा मतदारसंघ हा धानोरकर कुटुंबीयांचा मतदारसंघ असल्याचा दावा होतो. त्यामुळे काँग्रेसने आपल्याला संधी द्यावी, असे विधान अनिल धानोरकर यांनी केले आहे. आपल्या नावाचा उमेदवारीसाठी प्रथम विचार व्हावा. काँग्रेसने तिकीट दिले नाही, तर सर्व पर्याय उपलब्ध आहेत, असे धानोरकर म्हणाले.
भद्रावती नगर परिषदेचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी दंड थोपटले आहे. त्यामुळे खासदार धानोरकर यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे. धानोकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्यास प्रवीण काकडे यांचा पत्ता कट होणार आहे. तसे न झाल्यास धानोरकर परिवारातच बंड होणार आहे. त्यामुळे काकडे यांचा मार्ग अवघड होईल. भद्रावती-वरोरा मतदारसंघात धानोरकर कुटुंबाचेच सलग वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भद्रावती-वरोरातील मतदार अनिल धानोरकर यांना कौल देणार का, अशी चर्चा चंद्रपूर जिल्ह्यात आहे.