Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यातील सख्य साऱ्या जगाला ठाऊक आहे. मुनगंटीवार गडकरींना अगदी मोठ्या भावाप्रमाणे मानतात. पण कामाच्या बाबतीत त्यांचाही पिच्छा पुरवतात. याचा अनुभव आज (ता. 6) यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा येथे मुनगंटीवार यांच्या प्रचार सभेत आला. मतदारसंघासाठी काम खेचून आणताना ‘आपका पिछा ना..छोडुंगा..!, असे मुनगंटीवार गडकरी यांना उद्देशून म्हणाले.
महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ पांढरकवडा येथे नितीन गडकरी यांची सभा पार पडली. व्यासपीठावर माजी आमदार अण्णासाहेब पारवेलकर, आमदार संदीप धुर्वे, पुसदचे आमदार इंद्रनील नाईक, वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, वसंतराव घुईखेडकर. राजेंद्र महाडोळे, निलय नाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, महादेव सुपारे, गजानन बेजंकीवार, आनंद वैद्य, सुरेश डहाके, विष्णू उकंडे, अजय पालतेवार, किसन राठोड, विशाल देशमुख, रवी बेलुरकर, विनोद मोहितकर आदी होते.
मुनगंटीवार म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनी पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेशचे माजी अध्यक्ष एकाच मंचावर आहेत, हा दुर्मीळ योगायोग आहे. नितीन गडकरींनी पाण्याला हात लावता तर जलमार्ग तयार होतात, मातीला हात लावला तर हजारो किलोमीटरचे रस्ते तयार होतात. पहाडाला हात लावला तर बोगदे तयार होतात आणि कार्यकर्त्याला हात लावला की त्याचा नेता होतो. काही वर्षापूर्वी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला गडकरींनी हात लावला होता आणि आज त्या कार्यकर्त्याचा नेता झालेला तुम्ही सर्वजण बघत आहात, असे म्हणत त्यांनी गडकरींवर स्तुतीसुमने उधळली.
काही वेडे प्रार्थना करत आहेत..
गडकरींच्या पराभवासाठी काही लोक प्रार्थना करत आहे. पण वेड्यांनो तुमची प्रार्थना कधीही पूर्ण होणार नाही. कारण गडकरींनी लाखो लोकांच्या आयुष्यात प्रकाश आणला आहे. गडकरी माझे मोठे भाऊ आहेत. माझा गडकरींच्या तिजोरीवरही हक्क आहे. विश्वास ठेवा या मतदारसंघात विकास कामे करण्यासाठी त्यांनाही मी हैराण करून सोडणार आहे, असे सांगताना ‘तेरा पिछा ना.. म छोडुंगा सोनिये….’ या गाण्याची ओळ मुनगंटीवार यांनी म्हटली.
Lok Sabha Election : राजकारणाची व्याख्या बदलवण्याची गरज आहे !
आता कामांसाठी २५ वर्ष वाट बघण्याची गरज नाही. ही निवडणूक झाल्याझाल्याच कामे सुरू होतील. संसदेचे दरवाजे ज्या लाकडांनी बनले आहेत, ते लाकुड चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. जेव्हा हे लाकुड पाठवले, तेव्हा गडकरीसुद्धा याच दरवाजातून संसदेत जातील, हा भाव मा्झ्या मनात आला होता. पण आता मलासुद्धा त्याच दरवाजातून जायचे आहे. विकासावर मते मागा, जातीचे कार्ड खेळू नका, जातीचे राजकारण करून समाजासमाजांत विष पेरू नका, असे आवाहन त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराला केले. मी केलेली १०० कामे सांगू शकतो. तुम्हीही केलेल्या कामांवर मते मागा, असे म्हणत नितीन गडकरी फक्त एक टक्काच राजकारणी आहेत. बाकी पूर्ण वेळ ते शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारांसाठी काम करणारे कार्यकर्ते आहात, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.