Vidarbha Politics : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या स्टार प्रचारक माजी खासदार नवनीत राणा यांचा पराभव झाला. त्यानंतरही त्यांचं नशीब चमकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. थेट दिल्लीतून फोन आल्याने नवनीत राणा दिल्लीला रवाना झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला अमरावती लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली.
२७ एप्रिलला दुसऱ्याच दिवशी नवनीत राणा यांना भाजपाच्यावतीनं स्टार प्रचारक म्हणून देशातील विविध मतदारसंघांत प्रचारासाठी पाठवण्यात आलं. नवनीत राणा या 2019 मध्ये अपक्ष निवडून आल्यावर त्यांनी संपूर्ण पाच वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दर्शवला. यावेळी भाजपाच्यावतीनं त्यांना अमरावतीतून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र अटीतटीच्या लढतीत अवघ्या 19 हजार 731 मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला.
आता नवनीत राणा यांना दिल्लीतून फोन आल्याने चर्चांना उधाण आले आहे. त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात अतिशय चुरशीची लढत पाहायला मिळाली. संपूर्ण राज्याचं लक्ष या मतदारसंघाकडे लागून होते. जवळपास सर्वच पक्षांच्या दिग्गजांच्या प्रचार सभा या ठिकाणी झाल्या. अतिशय प्रतिष्ठेची लढत सर्वच पक्षांनी करून ठेवली होती.
या निवडणुकीत नवनीत राणा यांचा पराभव झाला. मात्र त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांना दिल्लीतून भाजपच्या पक्षश्रेष्ठींचे बोलवणे, असल्याबाबतचा फोन आला. त्यामुळे फोन येताच आमदार रवी राणा व नवनीत राणा तातडीने उशिरा रात्री अमरावतीतून दिल्लीला रवाना झाले आहेत.
नवनीत राणा यांनी दिल्ली, हैदराबाद अशा महत्त्वाच्या शहरांसह इतरही शहरांत भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ जाऊन सभा, रोड शो केले होते. दरम्यान नवनीत राणा यांना पक्ष आता महत्त्वाची जबाबदारी देऊ शकतो. त्यामुळेच त्यांना दिल्लीतून फोन आला, अशी चर्चा काल गुरुवारी रात्री शहरात सुरू झाली होती. दुसरीकडे दिल्लीत सध्या सरकार स्थापनेची तयारी भाजपकडून सुरू झाली आहे. मंत्र्यांच्या नावांची लवकरच घोषणा होणार आहे. या अनुषंगाने राणा यांना पक्षश्रेष्ठींच्या माध्यमातून फोन येणे, ही बाब महत्त्वाची मानली जात आहे.
Kangana Ranaut : चंदीगढ विमानतळावर, खासदाराला दिली झापड गालावर
भाजपची ताकद वाढवण्यासाठी मोठी जबाबदारी..
माजी खासदार नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढविण्यासाठी मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. कारण अमरावती जिल्ह्यात सध्या तरी काँग्रेसचे वर्चस्व आहे. या जिल्ह्यात एकाही विधानसभा क्षेत्रात भाजपचा आमदार नाही. तर लोकसभेतही भाजपला अपयश आले. मात्र पुढे येथे भाजप वाढविण्यासाठी नवनीत राणा यांना जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
राणा यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याचीदेखील शक्यता आहे. विदर्भातील महत्वाचा जिल्हा म्हणून अमरावतीकडे पाहिले जाते. येथे भाजपला आपले वर्चस्व टिकवण्यासाठी आणि वाढविण्यासाठी या मतदारसंघावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे नवनीत राणा यांना मंत्रिपद मिळाल्यास त्याचा भविष्यात फायदाही होण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.