महाराष्ट्र

Congress : गोपालदास अग्रवाल यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित!

Gopaldas Agrawal : ‘द लोकहित’चे वृत्त खरे ठरणार; 13 सप्टेंबरला प्रवेशाची शक्यता

‘द लोकहित’ने व्यक्त केलेलं भाकित पुन्हा एकदा खरं ठरणार आहे. लवकरच गोंदियाचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, हे निश्चित झाले आहे. भाजपला रामराम ठोकून त्यांची घरवापसी १३ सप्टेंबरला होईल, असे बोलले जात आहे.

पाच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकी दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अग्रवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गोपालदास अग्रवाल सुध्दा भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू झाली. आणि नेमके तसेच झाले. पण प्रवेशानंतर गोपालदास अग्रवाल भाजपमध्ये फारसे रुळले नाहीत.

भाजप सोडण्याचे कारण

गोंदिया जिल्ह्यात भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळे सुद्धा ते नाराज होते. पंधरा दिवसांपूर्वी पार पडलेल्या गोंदिया जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी त्यांना प्रश्न मांडण्यापासून रोखले होते. यामुळे त्यांनी नियोजन समितीच्या सदस्यपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्यानंतरच ते भाजपला लवकरच रामराम करतील अशी चर्चा जिल्ह्याच्या वर्तविली जात होती.

हायकमांडचा ग्रीन सिग्नल

अग्रवाल यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाला दिल्ली येथून श्रेष्ठींनी सुद्धा त्यांना हिरवी झेंडी दाखविल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांनी घरवापसी करण्याचा निर्णय घेतला आहे. गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्यांचे निकटवर्तीय, वरिष्ठ नेते, पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी सखोल चर्चा केल्याची माहिती आहे.

हेही कारण

माजी आमदार गोपालदास अग्रवाल व विद्यमान आमदार विनोद अग्रवाल यांचे राजकीय वैर सर्वांना माहिती आहे. इतक्यात विनोद अग्रवाल यांची भाजपशी वाढलेली सलगी गोपासदास अग्रवाल यांना खटकत होती. भाजपच्या कार्यक्रमांमध्येही विनोद अग्रवाल दिसत आहे. त्यामुळे भाजपकडून विशेष काही मिळणार नाही, याचा गोपालदास यांना अंदाज आला.

पत्रकार परिषदेकडे लक्ष

याबाबत गोपालदास अग्रवाल यांचे पुत्र विशाल अग्रवाल यांनी रविवारी पत्रकार परिषद बोलाविली आहे. त्यात संपूर्ण चित्र स्पष्ट केले जाईल, असेही संगितले आहे. त्यामुळे रविवारी पत्रकार परिषदेत माजी आ. गोपालदास अग्रवाल नेमकी काय घोषणा करतात याकडे नजरा लागल्या आहेत.

error: Content is protected !!