Political War : खैरलांजी प्रकरण झाले तेव्हा राज्यात काँग्रेसचे सरकार होते. त्यावेळी नितीन राऊत मंत्री होते. या प्रकरणात माझ्यावर खोटे आरोप लावले. कारागृहात टाकण्यात आले. राऊत यांनी मला मारण्याचाही प्रयत्न केला, असे गंभीर आरोप माजी आमदार डॉ. मिलिंद माने यांनी केले. ते उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे पराभूत उमेदवार आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राऊत यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत.
डॉ. मिलिंद माने यांनी 2014 मध्ये नितीन राऊत यांना पराभूत केले होते. मात्र, त्यानंतर सलग दोन निवडणुका राऊत यांनी मानेंवर सरशी केली. उत्तर नागपूरमध्ये आपलेच वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. 2024 च्या निवडणुकीत डॉ. मिलिंद माने यांना विजयाची आशा होती. मात्र, राऊत यांनी 28 हजार 467 मतांनी मानेंवर मात केली. नागपुरातील सहा विधानसभांपैकी चार भाजपकडे, तर दोन काँग्रेसकडे आल्या. पश्चिम व उत्तर नागपुरात काँग्रेसने बाजी मारली. राज्यभरात भाजप-महायुतीला बहुमत मिळाले. महाविकास आघाडीने ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन पुकारले आहे. त्याचवेळी माने यांनी पत्रकार परिषद घेऊन राऊत यांच्यावर आरोप केले.
उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघामध्ये माझा डमी उमेदवार म्हणून अपप्रचार करण्यात आला. आमदार नितीन राऊत यांनी माझी बदनामी केली, असाही आरोप माने यांनी केला आहे. प्रचारादरम्यान काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन माझी बदनामी केली. माझ्या विरोधात खोट्या गोष्टी पसरवून जनतेची दिशाभूल केली, असा आरोप माने यांनी केला.
राऊत फक्त श्रेय घेतात
उत्तर नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. येथील अनेक समस्या सोडवल्या. राऊतही पूर्वी सरकारमध्ये मंत्री होते. पण, त्यांनी उत्तर नागपुरात एकही काम केले नाही. उलट गडकरी आणि फडणवीस यांनी केलेल्या कामांचे फक्त श्रेय घेतले, अशी टीकाही त्यांनी केली.
वीरेंद्र कुकरेजा उमेदवार होते का?
उत्तर नागपूरमध्ये मी भाजपचा उमेदवार होतो. पण राऊत यांनी वीरेंद्र कुकरेजा अधिकृत उमेदवार आहेत असे सांगत माझा डमी उमेदवार म्हणून प्रचार केला. खरच कुकरेजा उमेदवार होते का?, असा सवाल त्यांनी केला. ‘मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात गेलो तर स्वयंसेवक असल्याचे लोकांना सांगितले. मी बौद्ध धम्माचा उपासक आहे, पण मला मातंग समाजाचा आहे, असे लोकांना सांगितले,’असेही ते म्हणाले.