Paddy Crop : लोकसभा निवडणुकीच्या निकालाने चांगल्या चांगल्यांची झोप उडविली आहे. लोकसभेच्या निकालावरुन सुस्त असलेले नेते, कार्यकर्ते अगदी खळबडून जागे झाले आहेत. विधानसभेसाठी विरोधकांना आशेची किरण जागली तर सत्ताधाऱ्यांना वाट सोपी नसल्याचा साक्षात्कार झाला. त्यामुळेच आता जुनी सारी मळभ दूर सारून कामाला लागण्याची लगबग आहे. अशात मुद्दे काढून त्यावरुन ‘लक्ष’ वेधण्याचे ध्येय आखले जात आहे. धान उत्पादक जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील धानाच्या प्रश्नावरून माजी मंत्री राजकुमार बडोले ‘ॲक्टिव्ह’ झाले आहेत. त्यांनी धानाच्या मुद्द्यावर होत असलेल्या दिरंगाईबाबत थेट उपमुख्यमंत्र्यांकडेच धाव घेतली आहे.
विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने माजी मंत्री तथा माजी आमदार राजकुमार बडोले पुन्हा अर्जुनी मोरगाव-सडक अर्जुनी या आपल्या मतदारसंघात सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. लोकांच्या भेटीगाठी, जनतेच्या समस्या आदी कामांकडे लक्ष देत असल्याचे बडोले पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यातील राईस मिल असोसिएशनच्या आडमुठे धोरणामुळे मागील सात महिन्यांपासून धान शासकीय गोदामात पडून आहे. परिणामी अनेक सहकारी संस्थांनी रब्बी हंगामात धानखरेदी केली नाही. दुसरीकडे गोदामात पडून असलेल्या धानाची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. यामुळे सहकारी संस्थाही अडचणीत आल्या आहेत. एकंदरीत भरडाईसाठी धानाची उचल न झाल्याने बळीराजा व शासन या दोघांचे नुकसान होत आहे. या संदर्भात राज्य शासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना केली आहे. यासंदर्भात बडोलेंनी उमुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. त्याचबरोबर या विषयावर जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असल्याचेही त्यांनी ‘द लोकहित’शी बोलताना सांगितले.
27 लाख क्विंटल धानाची साठवणूक
खरीप व रब्बी हंगामात आधारभूत किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात धान खरेदी करण्यात आली. आज घडीला गोंदिया जिल्हयातील सहकारी संस्थांच्या गोदामात 27 लाख क्विंटलहून अधिक धान साठवणूक करून ठेवले आहे. मागील सात महिन्यांपासून भरडाईसाठी धानाची उचल न झाल्याने तसेच गोदाम धानाने हाऊसफुल्ल असल्याने अनेक सहकारी संस्थांनी रब्बी हंगामात धान खरेदी केली नाही. यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने खासगी व्यापाऱ्यांकडे धाव घ्यावी लागले आणि नुकसान सहन करून घ्यावा लागला. दुसरीकडे गोदामात धान पडून असल्याने सहकारी संस्थाही अडचणीत आल्या आहेत.
राईस मिलर्स असोसिएशनचे आडमुठे धोरण व त्यांच्या मागण्यासंदर्भात पणन विभागाकडून प्रतिसाद देण्यात आला नाही. गोंदिया जिल्हा प्रशासन देखील या प्रकरणाबाबत सुस्त आहे. या प्रकरणातून शासन आणि शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याची दखल घेत माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन भरडाईसाठी धानाची उचल करण्यासंदर्भात तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करीत निवेदन दिले.