Shiv Sena : महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळावा ही सगळ्यांची इच्छा आहे. पण याचा अर्थ रश्मी ठाकरे यांच्या नावाची चर्चा व्हावी असे नाही. रश्मी ठाकरे या शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आहेत. त्या नेहमीच त्यांच्यासोबत असतात. परंतु यामुळे रश्मी ठाकरे या राजकारणात येतील अशी चर्चा करणे चुकीचे आहे. त्यामुळेच रश्मी ठाकरे यांच्या नावाची चर्चा मुख्यमंत्रिपदासाठी होऊ शकत नाही, असे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
बुधवारी (ता. 18) पेडणेकर यांचे नागपुरात आगमन झाले. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की महायुती (Mahayuti) सरकारने महाराष्ट्रातील बहिणींना दरमहा दीड हजार रुपये देण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक घरात सुशिक्षित मुलगी आहे. मुलगा आहे. त्यांना अशी खिरापत नको आहे. त्यांच्या हाताला काम हवे आहे. रोजगार हवा आहे. दीड हजार रुपयांमध्ये काय होते, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यामुळे त्यांना त्यांचे शिक्षण व पात्रतेच्या आधारावर रोजगार दिला जाणे गरजेचे आहे.
सगळे लक्षात येते
महाराष्ट्रातील निवडणूक जवळ आल्यानंतर अचानक लाडकी बहीण कशी आठवली, हे प्रत्येक महिलेला ठाऊक आहे. लाडकी बहीण योजनेचा कोणताही परिणाम निवडणुकीत दिसणार नाही. प्रत्येक घरात सुशिक्षित आणि सुजाण सदस्य आहेत. त्यांना सगळे लक्षात येत आहे. फक्त लोक बोलत नाही. काय करायचे हे त्यांनी ठरवून ठेवले आहे. निवडणुकीत ते योग्य निर्णय घेतील. सध्या शिवसेनेकडून पूर्व विदर्भातील जिल्ह्यांचा दौरा करण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेतून प्रत्येक महिलेला दरमहा दीड हजार रुपये देण्यात येत आहेत. यामुळे महिला खरच किती खुश आहेत, हे या दौऱ्यात जाणून घेणार असल्याचे पेडणेकर म्हणाल्या.
नितीन गडकरींचे कौतुक
लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) भक्कम यश मिळाले. विशेषत: विदर्भात आघाडीने मुसंडी मारली. विदर्भ हा भाजपचा (BJP) गड मानला जातो. मात्र विदर्भात भाजपचे केवळ नितीन गडकरी हे स्वबळावर विजयी झाले आहेत. अकोला (Akola) लोकसभा मतदारसंघात मतविभाजन झाल्यामुळे भाजपला कसाबसा विजय राखता आला. त्यामुळे महाविकास आघाडीमधील सर्वच पक्षांनी सध्या विदर्भावर लक्ष केंद्रीत केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, शिवसेना खासदार संजय राऊत, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक नेते विदर्भाचा दौरा करीत आहेत. रश्मी ठाकरे यांनी देखील राज्यात दौरा केला. त्यानंतर आता मुंबईच्या (BMC) माजी महापौर किशोरी पेडणेकरही आपल्या ‘टीम’सोबत विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत.