BJP Politics : लोकसभा निवडणुकीत वेगवान घडामोडी घडण्याला वेग आला आहे. अकोल्यात भाजपकडून घराणेशाहीला तिकीट दिल्याचा आरोप करीत आज भाजपचे माजी आमदार व ओबीसी नेते नारायण गव्हाणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यापूर्वीच त्यांनी भाजप विरोधात दंड थोपटले होते आता अर्ज दाखल करून गव्हाणकर यांनी बंडाचे निशाण रोवले आहे. त्यामुळे गव्हाणकर यांचे बंड शांत करण्यात येणार की गव्हाणकर ठाम राहणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.
नारायण गव्हाणकर यांच्या उमेदवारीने भाजपच्या उमेदवाराला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. गव्हाणकर यांनी यापूर्वीही विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात बंड केले होते. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. आता पुन्हा लोकसभा निवडणुकीतही गव्हाणकर बंड करत आहेत. अकोल्यात सध्या तिरंगी लढत होणार असे मानले जात होते. मात्र आता यात ट्विस्ट आला आहे.
भाजपची डोकेदुखी
माजी आमदार नारायण गव्हाणकर यांच्या बंडामुळे अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे. अकोल्यात भाजपकडून विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत अनुप धोत्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अशात माजी आमदार नारायण गव्हाणकर यांनी निवडणुकीच्या मैदानात उडी घेतल्यामुळे ते भाजपच्या मतदानावर नक्कीच परिणाम करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काँग्रेस, ‘वंचित’चे आव्हान
भाजप समोर अकोल्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. भाजपने अकोला लोकसभा मतदारसंघात जातीचे कार्ड वर काढले आहे. थोड्याफार फरकाने काँग्रेसने देखील डॉ. पाटील यांना उमेदवारी देत भाजपला मात देण्याचा प्रयत्न चालवला आहे. अशातच आता नारायण गव्हाणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने जातीच्या ‘फॅक्टर’वर गव्हाणकर यांचे उमेदवारी देखील परिणाम दाखविणार आहे.