Mahavikas Aghadi : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच सर्वत्र राजकीय घडामोडी वेगाने सुरु झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच आता इनकमिंग आऊटगोईंगला सुरुवात झाली आहे. सध्या महायुतीतून अनेक नेते, पदाधिकारी हे महाविकासा आघाडीत प्रवेश करत आहेत. तर दुसरीकडे महाविकासाघाडीतही हेच चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच मागील १५ दिवसात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत तर आता शिवसेना (उबाठा) मध्ये मोठी इनकमिंग पाहायला मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची राज्यात लगबग सुरू झाली आहे. महायुती तसेच महाविकास आघाडीत अद्यापही जागावाटपाचा फॉर्म्युला समोर आलेला नाही. परंतु काही उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. अशातच भाजपनंतर मंगळवारी सायंकाळी एकनाथ शिंदे यांनी आपल्या ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. मात्र महायुतीतील इच्छूक नाराज नेत्यांनी दुसऱ्या पक्षात उड्या मारण्यास सुरूवात केली आहे. अशातच आज दोन माजी आमदारांनी शिवसेना ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला आहे.
रत्नागिरी मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार बाळ माने इच्छूक होते. परंतु महायुतीत ही जागा शिवसेना शिंदे गटाच्या उदय सामंत यांना गेल्याने त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. तर कोल्हापुरमधील राधानगरी विधानसभेचे माजी आमदार के.पी. पाटील यांनी देखील आज मातोश्रीवर त्यांच्या सहकाऱ्यांसह ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी माजी खासदार विनायक राऊत, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक आणि इतर पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित होते.
श्रीगोंदा विधानसभेतील अजित पवार गटाच्या नगर जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे आणि राजेंद्र नागवडे यांनी देखील त्यांच्या सहकाऱ्यांनी मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश केला. तर नाशिक जिल्ह्यातील अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी देखील ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना विधानसभा निवडणुकीत उतरवले जाणार असल्याची चर्चा आहे.
बुलढाण्यातही इन्कमिंग…
राज्याच्या इतर जिल्ह्यांप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांमध्ये इन्कमिंग पाहावयास मिळत आहे मेकर विधानसभा मतदारसंघांमध्ये मंत्रालयात उच्च पदावर कार्यरत व स्वच्छ निवृत्ती घेणारे अधिकारी खरात यांनी नुकताच पक्षामध्ये प्रवेश घेतलेला होता दरम्यान काल त्यांना मेहकर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित करण्यात आली. दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते संदीप शेळके यांनी यापूर्वी शिवबंधन बांधलेले आहेत तर आता त्यांच्याच परिवारातील बुलढाणा मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके यांनी काल उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हातावर शिवबंधन बांधले त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग सुरू असल्याचे दिसून येत आहे.