Benefits To Farmers : वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी झटका मशिनचा वापर करतात. यासाठी शासनाकडून त्यांना अनुदानाचे वाटप करण्यात येते. वन विभागाकडून ही योजना राबविण्यात येते. जंगलालगतच्या परिसरात शेती असणाऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. वन विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या या योजनेला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या दृष्टीने आता आणखी सोयीस्कर केले आहे. यासंदर्भातील घोषणा त्यांनी मंगळवारी (ता. एक) पोंभूर्णा येथे केली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत आयोजित आदिवासी मेळाव्यात वनमंत्र्यांनी ही घोषणा केली.
मुनगंटीवार म्हणाले, ‘झटका मशिनबाबत काही निर्णय विचाराधीन होते. झटका मशिन देताना गावांमधील वनसेवा समितींना अधिकार देण्याबाबतचा प्रस्ताव होता. यासंदर्भातील शासन निर्णय (GR) काढण्यात आला आहे. त्यानुसार वनसेवा समिती, जॉइंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटी आणि आदिवासी कमिटींच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना वेगाने लाभ देण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना मशिनचे 15 हजार रुपये देण्यात येणार आहेत.’
असा होणार लाभ
झटका मशिनसंदर्भातील निर्णय आता वनसेवा समिती, जॉइंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटी आणि आदिवासी कमिटींच्या माध्यमातून होणार आहे. यासाठी पात्र लाभार्थी शेतकऱ्याची निवड करण्यात येईल. निवड झालेल्या शेतकऱ्यांना 15 हजार रुपये मिळणार आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात (DBT) जाणार आहे. वनविभाग आणि सरकारकडून आदिवासी समाजासाठी मोठ्या प्रमाणावर योजना राबविण्यात येत आहेत. मी स्वत: आदिवासी समाजाच्या विकास आणि प्रगतीसाठी आग्रही आहे. त्यामुळे आदिवासी समाजासाठी असलेल्या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक प्रचार-प्रसार करावा, असे आवाहनही मुनगंटीवार यांनी केले.
Sudhir Mungantiwar : पोंभूर्णाच्या आयटीआयला भगवान विर बिरसा मुंडा यांचे नाव
चंद्रपुर जिल्ह्यातील प्रत्येक गावात यासाठी जाहीर कार्यक्रम घ्यावे. झटका कुंपणासाठी अर्ज भरून घ्यावेत. पात्र व्यक्तीकडून येणाऱ्या प्रत्येक अर्जाला मंजुरी प्रदान करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचेही मुनगंटीवार म्हणाले. पोंभूर्णा तालुक्यात असलेली जवळपास सर्व गावे या योजनेसाठी निवडण्यात येणार आहेत. आदिवासी समाज लढवय्या आहे. जल, जमीन आणि जंगल यांच्याबद्दल प्रामाणिक आहे. निसर्गाचा रक्षणकर्ता आहे. त्यामुळे या समाजाचा परिपूर्ण विकास झालाच पाहिजे. आदिवासी समाजाच्या विकासासाठी आपण सुरुवातीपासूनच आग्रही होतो. भविष्यातही आदिवासींच्या विकासासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करणार असल्याचा शब्द सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरातील या मेळाव्याच्या माध्यमातून दिला.
गोंडवाना विद्यापीठाच्या स्थापनेत व्यापक भूमिका बजावणाऱ्या मुनगंटीवार यांनी आदिवासी समाजाला एकटे सोडणार नसल्याची ग्वाही दिली. तेंदूपत्त्याला बोनस मिळवून देतानाच आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना ‘मिशन शौर्य’साठी पाठविण्याचे सौभाग्य आपल्याला प्राप्त झाल्याचेही वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले. आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतिगृह, शबरी घरकुल योजना, वीर बाबुराव शेडमाके यांचे सभागृह उभारणे अशी कामे करताना मनापासून आनंद झाल्याचेही त्यांनी सांगितले. आदिवासी प्रवर्गातील पदभरतीसाठीही आग्रही भूमिका घेतल्याचे मुनगंटीवार यावेळी म्हणाले.