Important Achievement : राष्ट्रीय नागरी सेवा प्रशिक्षण संस्थांच्या (NSCSTI) मानकानुसार चंद्रपूर वन प्रबोधिनीला ‘थ्री स्टार’ मानांकन प्राप्त झाले आहे. चंद्रपूर वन प्रबोधिनीच्या नागरी सेवा प्रशिक्षणातील उत्कृष्टतेची दखल घेत हे मानांकन देण्यात आले आहे. क्षमता निर्माण आयोगाने ही मान्यता प्रदान केली आहे. वन अधिकारी, पदाधिकारी यांच्या प्रशिक्षणाची गुणवत्ता आणि परिणामकारकता वाढविण्याच्या प्रक्रियेत एक महत्त्वाचा टप्पा प्रबोधिनीने गाठला आहे.
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते यासंदर्भातील सन्मानपत्र संस्थेला प्रदान करण्यात आले. भारतीय वन सेवा (IFS) अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या डेहराडूनमधील इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमी (IGNFA) सोबतच चंद्रपूर वन प्रबोधिनीला आता भारतातील 14 वन प्रशिक्षण संस्थांपैकी उत्कृष्ट श्रेणीमध्ये मान्यता मिळाली आहे. नागरिक सेवा प्रशिक्षण संस्थासाठी राष्ट्रीय मानकांचे एक महत्त्वाचे पाऊल आहे. हे मानक मिशन कर्मयोगी उपक्रमाचा एक भाग आहे.
आठ आधारावर सन्मान
राष्ट्रीय नागरी सेवा प्रशिक्षण संस्थांच्याअंतर्गत मान्यता प्रक्रियेत अभ्यासक्रम डिझाइन, शिक्षक विकास, डिजिटलायझेशन, सहकार्य यासारख्या आठ मुख्य आधारांवर लक्ष दिले जाते. कठोर मूल्यमापन प्रक्रिया राबविण्यात येते. क्षमता निर्माण आयोग आणि राष्ट्रीय मान्यता शिक्षण व प्रशिक्षण मंडळाकडून केलेले डेस्कटॉप मूल्यमापन आणि ऑन-साइट मूल्यांकन यात समाविष्ट आहे. संस्थेला मिळालेल्या या यशाबद्दल अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण) तथा चंद्रपूर वन प्रबोधिनीचे संचालक एम. श्रीनिवास रेड्डी (IFS M. Shrinivas Reddy) यांनी राज्याचे वन मंत्री सुधीर मुंगंटीवार यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा उल्लेख केला. वन प्रबोधिनीला या महत्त्वपूर्ण कामगिरीसाठी वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात वनमंत्री मुनगंटीवार यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि पाठिंबा महत्त्वपूर्ण ठरल्याचे ते म्हणाले.
वन प्रबोधिनी नवीनतम आव्हानांचा सामना करण्यासाठी सुसज्ज आहे. या मानांकनामुळे अकादमीच्या प्रशिक्षण पद्धतींमध्ये सतत सुधारणा आणि नावीन्यपूर्ण कार्यक्रमांचा सहभाग होत असल्याचे सिद्ध झाले आहे. संरचित आणि उच्च गुणवत्तेच्या प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे भारतातील प्रशासनाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी संस्था काम करीत आहे. वन प्रबोधिनी यापुढे या मान्यतेचा उपयोग करून वनविभाग आणि देशाच्या नागरी सेवेत आणखी योगदान देत राहिल, असा विश्वासही रेड्डी यांनी व्यक्त केला. चंद्रपूर-मूल मार्गावर वनराजीक महाविद्यालयाच्या जागेवर वन प्रबोधिनी 4 डिसेंबर 2014 मध्ये स्थापन झाली आहे. ही संस्था 100 टक्के शासन अनुदानावर आहे. वनअकादमी संस्था ही वन विभागाचे वन्यजीव व्यवस्थापन, उत्पादन व वनांवर अवलंबून असणारी संस्था म्हणून काम करीत आहे.