महाराष्ट्र

Assembly Election : विदर्भात कोण होणार ‘सेनापती’?

Shiv Sena : ‘आम्ही खरे वाघ’ सिद्ध करण्यासाठी दोन्ही शिवसेना आक्रमक

Eknath shinde Vs Uddhav Thackeray : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना हे महाराष्ट्राच्या निवडणुकीतील आजवरचे मुख्य राजकीय पक्ष. पण एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने शिवसेनेची दोन शकले झाली व उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशा दोन सेना, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे शरद पवार आणि अजित दादा यांचे स्वतंत्र पक्ष अस्तित्वात आले. मुंबईच्या तुलनेत विदर्भात शिवसेनेचा तसा फारसा प्रभाव नाही, मात्र यावेळी या दोन सेना विदर्भातील पाच मतदारसंघात थेट एकमेकांविरोधात रिंगणात आहेत. या दोन शिवसेनेपैकी कोणाचे आमदार जास्त निवडून येतात त्यावरून विदर्भातील ‘सेनापती’ उद्धव ठाकरे होतात की एकनाथ शिंदे याचे उत्तर मिळणार आहे.

हा आहे मतदारसंघ..

रामटेक, दर्यापूर, मेहकर, बुलढाणा आणि बाळापूर या पाच मतदारसंघात शिंदे सेना आणि उद्धवसेना आमने- सामने आहेत. रामटेकमध्ये शिंदे सेनेने आशिष जयस्वाल यांना उमेदवारी दिली आहे, तर उद्धव सेनेने विशाल बरबटे यांना मैदानात उतरविले आहे. आशिष जयस्वाल गेल्या अनेक वर्षांपासून येथील प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यामुळे त्यांचे राजकीय वजन जास्त आहे. पण लोकसभा निवडणुकीत रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे श्याम बर्वे विजयी झाले. त्यामुळेच महाआघाडीच्या अपेक्षा वाढल्या आहेत व उद्धव सेनेचे बरबटे ही जागा काढतील, असा विश्वास त्या पक्षाला आहे.

जागावाटपात ही जागा उद्धव सेनेला गेल्यामुळे नाराज झालेले काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी येथून बंडखोरी केली. त्यामुळे काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. मात्र ही बंडखोरी बरबटे यांच्यासाठी अडचणीची ठरू शकते. दर्यापूरमध्ये शिंदे सेनेचे अभिजित अडसुळ आणि उद्धव सेनेचे गजानन लवटे, मेहकरमध्ये शिंदे सेनेचे संजय रायमुलकर व उद्धव सेनेचे सिद्धार्थ खरात, बुलढाण्यात शिंदेसेनेचे संजय गायकवाड व उद्धव सेनेच्या जयश्री शेळके आणि बाळापूरमध्ये शिंदेसेनेच नितीन देशमुख व उद्धव सेनेचे बळीराम सिरस्कर यांच्यात थेट लढत होत आहे. त्यामुळे आजवर एकाच पक्षात असणारे आता एकमेकांच्या विरोधात प्रचार करताना दिसत आहेत.

शिवसेनेत फूट पडण्यापूर्वी म्हणजेच 2019 च्या निवडणुकीत शिवसेना विदर्भात 12 जागांवर लढली होती. यावेळी दोन्ही शिवसेना मिळून 18 जागांवर लढत होत आहेत. त्यामुळे आम्हीच खरे ‘वाघ’हे सिद्ध करण्यासाठी दोन्ही सेनेचे प्रयत्न सुरू आहेत. रिसोड, भंडारा आणि दिग्रस येथे शिंदे सेना विरुद्ध काँग्रेस अशी लढत होऊ घातली आहे. रिसोडमध्ये शिंदेंनी भावना गवळी यांना उमेदवारी दिली आहे. गवळी यापूर्वी शिवसेनेच्या खासदार होत्या. त्यापूर्वी त्यांचे वडील पुंडलिकराव गवळी हेदेखील सेनेचे खासदार होते. शिवसेना फुटीनंतर त्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्या. मात्र एप्रिलमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे त्या नाराज झाल्या होत्या.

यांनी लढवली निवडणूक

नंतर त्यांना विधान परिषदेत पाठविण्यात आले. त्यामुळे सध्या त्या विधान परिषद सदस्य आहेच, पण आता विधानसभेच्या रिंगणातही त्यांना उतरविण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे अमित झनक हे निवडणूक लढत आहेत. या मतदारसंघात भाजपचे अनंतराव देशमुख यांनी बंडखोरी केली असल्याने गवळी यांचे टेंशन वाढले आहे. भंडाऱ्यात अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांची लढत काँग्रेसच्या पूजा ठवकर यांच्याशी आहे. दिग्रसमध्ये शिंदे सेनेचे संजय राठोड आणि काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांच्यात सामना आहे. हे दोन्ही दिग्गज नेते आहेत. ठाकरे काँग्रेसच्या काळात मंत्री होते, राठोड विद्यमान सरकारमध्ये मंत्री आहेत. हे आजी- माजी मंत्री वीस वर्षांनी एकमेकांच्या विरोधात रिंगणात पाहायला मिळत आहेत.

Chandrapur District Bank : संतोष रावत यांचा कारनामा काँग्रेसला घेऊन बुडणार 

थेट सामना

अकोला पूर्व, वाशीम आणि वणी या तीन मतदारंसंघात उद्धव सेना विरुध भाजपा असा थेट सामना आहे. अकोला पूर्वमध्ये भाजपचे रणधीर सावरकर यांच्या विरोधात उद्धव सेनेचे जिल्हा प्रमुख गोपाल दातकर उभे आहेत. वंचित बहुजन आघाडीमुळे येथे तिरंगी लढत होणार आहे. वाशीममध्ये उद्धवसेनेने डॉ. सिद्धार्थ देवळे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात भाजपचे श्याम खोडे आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील वणी मतदारसंघात भाजपने पुन्हा संजीवरेड्डी बोदकुरवार या विद्यमान आमदारांना उमेदवारी दिली आहे. उद्धव सेनेने संजय देरकर यांना त्यांच्या विरोधात उभे केले आहे. येथे काँग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीचा फटका देरकर यांना बसू शकतो. येथे मनसेने राजू उंबरकर यांना उमेदवारी दिल्याने रंगत वाढली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!