BJP Congress: एकेकाळी नागपूर शहर हे काँग्रेसचा गड मानले जायचे. महानगरपालिका असो, विधानसभा असो वा लोकसभा; निवडणुकांमध्ये काँग्रेसचाच डंका होता. भाजप अपवादाने एखादी निवडणूक जिंकायचे. मात्र, पश्चिम, पूर्व, मध्य या मतदारसंघांमध्ये हळूहळू काँग्रेसचे वर्चस्व कमी होत गेले आणि आज सहापैकी चार मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत. मात्र यंदाची निवडणूक वेगळी आहे. दक्षिण-पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस आणि पूर्वमध्ये कृष्णा खोपडे हे दोन उमेदवार बिनधास्त आहेत. पण, इतर मतदारसंघांमध्ये भाजपला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.
उमेदवार बघून ‘आरामात निवडून येणार’ असे म्हणणे नागपूरमध्ये सद्यस्थितीत फक्त पूर्व आणि दक्षिण-पश्चिमच्या बाबतीत होत आहे. अर्थात गेल्या निवडणुकीत दक्षिण-पश्चिममध्ये फडणविसांच्या विरोधात आशीष देशमुख लढले होते. देशमुखांचा पराभव झाला, पण फडणवीस यांची आघाडी कमी करण्यात त्यांना यश आले होते. त्यामुळे फडणवीस यांना कष्ट घ्यावेच लागणार आहेत. दुसरीकडे पूर्वमध्ये कृष्णा खोपडे यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. नितीन गडकरींनाही लोकसभेत सर्वाधिक आघाडी पूर्वमध्येच मिळाली होती. पण, यंदा राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) दुनेश्वर पेठे त्यांच्याविरोधात उभे आहेत. त्यामुळे आघाडी कायम ठेवण्याची कसरत खोपडेंना करावी लागणार आहे.
भाजपसाठी सर्वांत मोठे आव्हान मध्य नागपूर आणि दक्षिण नागपुरात आहे. मध्य नागपूरमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होणार आहे. केवळ मतांचे गणीत हलबा समाजाच्या उमेदवारावर अवलंबून आहे. याठिकाणी हलबा समाजाची 70 हजाराहून अधिक मते आहेत. ही सगळी मतं एकगठ्ठा हलबा समाजाच्या उमेदवाराला गेली तर निकालच वेगळा लागू शकतो. मात्र, हलबा समाजातील मते फुटली तर भाजपचे प्रवीण दटके आणि काँग्रेसचे बंटी शेळके यांच्यात काट्याची टक्कर होईल, हे निश्चित आहे.
निश्चित..
दक्षिण नागपूरचा उमेदवार ठरवताना महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये वाद ताणला गेला. दहा दिवस केवळ याच मतदारसंघासाठी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात वाद झाला. त्यानंतर काँग्रेसचे गिरीश पांडव यांना उमेदवारी जाहीर झाली. भाजपने पहिल्याच यादीत मोहन मते यांचे नाव घोषित केले. मोहन मते यांना दुसऱ्यांदा संधी दिली आहे. गेल्या निवडणुकीत मोहन मते अवघ्या 4013 मतांनी विजयी झाले होते. त्यामुळे सुरुवातीला याच मतदारसंघात उमेदवार बदलाची शक्यता जास्त होती. मात्र आता सलग दुसऱ्यांदा भाजप-काँग्रेस थेट लढत होईल. यात गेल्यावेळचा निसटता पराभव यंदा विजयात रुपांतरित करण्यासाठी पांडव कष्ट घेतील, हे निश्चित आहे.
Assembly Election : अकोल्यासह राज्यभरात राहुल गांधींच्या सभा
उत्तर, पश्चिमचे ‘जर तर’!
उत्तर नागपुरात अनुसूचित जातीची मते जास्त आहेत. त्यामुळे भाजप असो वा काँग्रेस मतांचे विभाजन ही एकमेव बाब कुण्या एकाला विजयाकडे घेऊन जाऊ शकते. काँग्रेसचे नितीन राऊत आणि भाजपचे मिलींद माने यंदा पुन्हा आमने-सामने उभे ठाकले आहेत. यांच्यात बहुजन समाज पार्टीचे मनोज सांगोळे कुणाची मते घेतात, यावर सारं काही अवलंबून आहे. पश्चिम नागपूरचे चित्र पूर्णपणे वेगळे आहे. काँग्रेसपुढे बंडखोर नरेंद्र जिचकार यांचे आव्हान आहे, तर भाजपपुढे नाराज नेत्यांचे. याठिकाणी भाजपने कोणताही उमेदवार दिला तरीही काँग्रेसचे विकास ठाकरेच निवडून येणार, असे म्हटले जायचे. मात्र, सध्यातरी अशी परिस्थिती नाही. त्याचवेळी भाजपचे सुधाकर कोहळे यांनीही बिनधास्त राहावे, असेही चित्र नाही.