Murtizapur Constituency : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. दोन्ही युती आणि आघाडीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला जागा वाटपाचा तिढा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत सुरूच राहणार आहे. त्यामुळे अनेक विद्यमान आमदारही वेटिंगवर ठेवण्यात आले आहे. अकोल्यातील मूर्तिजापूर मतदारसंघात गेल्या तीन टर्मपासून आमदार असणाऱ्या हरीश पिंपळे यांना वेटिंगवर ठेवण्यात आले होते. आमदार पिंपळे यांचं तिकीट कापलं जाणार अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली होती. अखेर 28 ऑक्टोबर रोजी पिंपळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारी जाहीर होताच पिंपळे यांना अश्रू अनावर झालेत. ते माध्यमांसमोरच ढसाढसा रडले.
राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक पार पडणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची 29 ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीत जागा वाटपावर घमासान पाहायला मिळाले. अनेकांना डच्चूही मिळाला. त्यामुळे नाराजांनी दुसऱ्या पक्षाची किंवा अपक्षाची साथ धरली. महायुतीत जागा वाटपावरून मोठी धुसफूस पाहायला मिळाली. त्यामुळे विद्यमान आमदारांनाही वेटिंग राहावे लागले.
जीव टांगणीला
अकोल्यातील मूर्तिजापूर मध्येही गेल्या तीन टर्म पासून आमदार असलेल्या हरीश पिंपळे यांनाही वेटिंग राहावे लागले. एकीकडे जिल्ह्यातील पाचपैकी चारही मतदारसंघात महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र आमदार पिंपळे यांना शेवटपर्यंत वेटिंगवर ठेवण्यात आले. त्यामुळे पिंपळे यांचं तिकीट कापलं जाणार का? अशी शक्यताही वर्तविण्यात आली होती. मूर्तिजापूर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे सम्राट डोंगरदिवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे उमेदवार राहिलेले रवी राठी यांना डच्चू मिळाला.
राठी यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी सोडत भाजपची साथ धरली. त्यामुळे रवी राठी यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार, अशी चर्चा रंगली होती. आमदार पिंपळे समर्थक यांनी याचा विरोध करीत पक्ष श्रेष्ठींकडे पिंपळे यांनाच पक्षाने उमेदवारी द्यावी, अशी मागणी लावून धरली. अनेकांनी राजीनामेही दिले. हरीश पिंपळे हे वेटिंगवर असल्याने त्यांचीही धाकधूक वाढली. अखेर 28 ऑक्टोबर रोजी सायंकाळी भाजपकडून तिसरी यादी जाहीर झाली. त्या यादीत अखेर हरीश पिंपळे यांनाच चवथ्यांदा उमेदवारी जाहीर झाली. यादी येताच पिंपळे समर्थकांनी मूर्तिजापूर येथे जल्लोष केला. पिंपळे हे मूर्तिजापूर येथे दाखल होताच जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणला होता. पिंपळेही यावेळी भावूक झाले. शेवटी त्यांचे अश्रू अनावर झालेत. ते कार्यकर्ते आणि मीडिया प्रतिनिधींसमोरच त्यांनी ढसाढसा रडायला लागले.
Assembly Election : बोले तैसा न चाले… म्हणे आमचे व्हावे भले!
दबावतंत्र, राजीनामास्त्र
आमदार हरीश पिंपळे यांना चवथ्यांदा उमेदवारी मिळणार नसल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविण्यात आली होती. त्यामुळे तिकीट मिळणार नसल्याने आमदार पिंपळे यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे आमदार पिंपळे यांनाच उमेदवारी देण्याची मागणी केली. त्यासाठी दबावतंत्रांचा वापर करण्यात आला. शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपला राजीनामा देऊन पिंपळे यांना लवकर उमेदवारी जाहीर न झाल्याने रोष व्यक्त केला. पिंपळे यांच्याशिवाय दुसऱ्याला उमेदवारी देऊ नये, अशी मागणी ही लावून धरण्यात आली.