महाराष्ट्र

Assembly Election आता भाजपच्या टार्गेटवर विरोधकांचे बूथ!

BJP : कार्यकर्ते फोडाफोडीला सुरुवात; अमित शाहंच्या बैठकीनंतर धोरण

Nagpur : निवडणूकीच्या काळात राजकीय पक्षांमध्ये नेत्यांच्या इनकमिंग-आऊटगोईंगला वेग येतो. मात्र यावेळी भाजपकडून वेगळी रणनिती तयार करण्यात आली आहे. विरोधी पक्षातील मोठे नेते व पदाधिकारी फोडण्याऐवजी भाजपने बुथ पातळीवरील कार्यकर्ते ‘टार्गेट’ केले आहेत.

गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलेल्या फंड्यानुसारच भाजपने शहरातील विरोधकांच्या कार्यकर्त्यांची फोडाफोडी सुरू केली आहे. बुथपातळीवरच विरोधकांना कमकुवत करत पक्ष संघटनेच्या पायाच डळमळीत करण्याचा या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे.पुर्व नागपुरात भाजपने महाविकासआघाडीच्या कार्यकर्त्यांना संपर्क करत भाजपमध्ये येण्याचे आवाहन केले होते. दोन दिवसांअगोदरच काँग्रेसच्या जवळपास शंभर कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हे सर्व कार्यकर्ते बुथपातळीवरील कार्यकर्ते होते.

संपर्क सुरू

केवळ पूर्व नागपूरच नव्हे तर शहरातील इतर पाचही मतदारसंघांमध्येदेखील भाजपकडून महाविकासआघाडीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्यात आला आहे. पश्चिम नागपुरात आम आदमी पक्ष, उत्तरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट, वंचित बहुजन आघाडीचे काही कार्यकर्तेदेखील भाजपमध्ये आले असल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी दिली. पुढील आठवड्यात पक्षात आणखी कार्यकर्त्यांचे ‘इनकमिंग’ होईल असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.

२४ सप्टेंबर रोजी अमित शाह यांनी नागपूर दौऱ्यादरम्यान भाजप कार्यकर्त्यांना निवडणूकीच्या दृष्टीने १० सूत्रे सांगितली होती. यावेळी अमित शाह यांनी भाजपच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने बूथपातळीवर जाऊन काम करण्याचे आवाहन केले. महाविकास आघाडीतील उद्धवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे बूथपातळीवरील कार्यकर्ते भाजपमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करा. विरोधकांना बूथपातळीवर कमकुवत करण्यावर भर द्या, असे शाह यांनी सांगितले होते. मात्र त्यानंतर पक्षाच्याच विविध उपक्रमांमध्ये पदाधिकारी व्यस्त झाले व याकडे दुर्लक्ष झाले. मात्र निवडणूकीमुळे राजकारण तापले असताना भाजपने आता यावर भर देण्यास सुरुवात केली आहे.

Assembly Election: बसपाच्या अधिकृत उमेदवाराचा ‘गेम’!

पश्चिममध्ये सर्वाधिक टेंशन!

भाजपने इतर पक्षांचे कार्यकर्ते फोडायला सुरुवात केली असली तरीही पश्चिममध्ये भाजपपुढेच आव्हान आहे. याठिकाणी अनपेक्षित उमेदवारी देण्यात आल्याने भाजपमध्येच कमालीचा रोष आहे. विशेषतः संदीप जोशी, नरेश बरडे, दयाशंकर तिवारी, डॉ. नंदा जिचकार, माया इवनाते यांच्यामध्ये कमालीची नाराजी आहे. त्यांच्या नाराजीचा फटका भाजपला बसू शकतो. यादरम्यान, भाजपचे कार्यकर्तेही काँग्रेसच्या गळाला लागू शकतात.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!