Assembly Election : लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला काही प्रमाणात का होईना ‘अच्छे दिन’ आले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने इच्छूक उमेदवारांचे अर्ज मागवले होते. जिल्ह्यात 49 इच्छुकांनी अर्ज सादर केले. सर्वच मतदारसंघांमधून इच्छुकांचे अर्ज आले आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे सह प्रभारी कुणाल चौधरी यांनी 16 सप्टेंबर रोजी स्वराज भवनात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी इच्छुकांटी मोठी गर्दी पाहायला मिळाली.
लोकसभेत विजय
लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळाले. महाविकास आघाडीतील काँग्रेसला इतर घटक पक्षांच्या तुलनेत चांगल्या जागा जिंकता आल्या. अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला. मात्र या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराच्या मतदानात भरमसाठ वाढ झाली. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसचे मनोबल वाढले आहे.
आधीच गटा तटात विभागाल्या काँग्रेसला काही प्रमाणात का होईना अच्छे दिन आले असं म्हणता येईल. तर दुसरीकडे अकोला पश्चिम या मतदारसंघात काँग्रेसने लोकसभेत भाजपच्या विजयी उमेदवारापेक्षाही जास्त मतदान घेतले आहे. त्यामुळे अकोला पाश्चिममध्ये दावेदारांची संख्या ही वाढली आहे. जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसच्या इच्छुकांकडून दावा करण्यात येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील पाच मतदारसंघातून काँग्रेसच्या 49 इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत. यामध्ये सर्वाधिक अर्ज हे अकोला पश्चिम मधून आले आहेत.
काँग्रेस प्रभारींनी घेतला आढावा!
विधानसभानिहाय आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सह-प्रभारी कुणाल चौधरी यांच्या उपस्थितीत अकोल्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या आढावा बैठकीला जिल्ह्यातील 2009 व 2014 तसेच 2019 विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस पक्षाचे उमेदवार उपस्थित होते. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीचे इच्छुक उमेदवार, लोकसभेचे उमेदवार तसेच आदींशी चर्चा करण्यात आली. यावेळी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. अकोला जिल्ह्यातील एकूण 49 उमेदवार इच्छुक आहेत तेही या बैठकीला उपस्थित होते. मोठी गर्दी स्वराज्य भवन परिसरात पाहायला मिळाली.
पक्षनेत्यांची कसरत
लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला राज्यात अच्छे दिन आले आहेत. इच्छुक उमेदवारांची गर्दी पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगल्या जागा मिळत असल्याचे सर्व्हेमधून समोर आलं आहे. तर काँग्रेसचे प्रभारी कुणाल चौधरी यांनीही राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल असं म्हटलं आहे. महाविकास आघाडीचा कोणता उमेदवार मतदारसंघात जिंकू शकतो त्यानुसारच आढावा घेऊ. तसेच जो इच्छुक उमेदवार लोकांचे प्रश्न घेऊन लढणार त्याबद्दल काँग्रेस विचार करेल असेही चौधरी म्हणाले. मात्र इच्छुकांची गर्दी बघता पक्षनेत्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.