महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar: चंद्रपूरच्या ‘फ्लाइंग क्लब’ मधून आकाशात झेपावणार विमान

Chandrapur Flying Club : ऐरो क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजीवप्रताप रुडी यांच्यासोबत चर्चा

Development Project : राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या चंद्रपूरच्या ‘फ्लाइंग क्लब’ने आता उड्डाण घेतले आहे. नक्षलग्रस्त व आदिवासी जिल्ह्यातील युवक-युवतींना वैमानिक होता यावे, यासाठी मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूर येथे फ्लाइंग क्लब स्थापन करण्यात येत आहे. त्यासाठी सुधीर मुनगंटीवार दिल्लीमध्ये पाठपुरावा करत आहेत. महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन लवकरच या प्रकल्पाला गती मिळण्यासाठी त्यांनी पाऊल टाकले आहे.

पहिल्या टप्प्यात 10 प्रशिक्षणार्थ्यांना येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ऑक्टोबर 2023 रोजी नागपूर फ्लाइंग क्लबच्या ‘सेस्ना 172 आर’ या चार आसनी विमानाचे मोरवा विमातनळावर प्रात्यक्षिकसुद्धा घेण्यात आले. मोरवा येथे धावपट्टी, संरक्षण भिंत व इतर अनुषंगीक कामेसुद्धा करण्यात आली आहे. आता अंतिम टप्प्यात असलेल्या फ्लाइंग क्लबच्या कामाला गती मिळावी, तसेच लवकरात लवकर येथे वैमानिकाचे प्रशिक्षण सुरू व्हावे, यासाठी मुनगंटीवार यांनी नुकतीच दिल्ली येथे ऐरो क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय उड्डाण मंत्री राजीव प्रताप रुडी यांच्याशी चर्चा केली.

तांत्रिक मुद्द्यावर चर्चा

डीजीसीने काढलेल्या तांत्रिक मुद्द्यांची तातडीने पूर्तता करण्यासंदर्भात तसेच एरो क्लब ऑफ इंडिया यांनी नागपूर फ्लाइंग क्लबला लीजने दिलेल्या दोन विमानाची लीज वाढवून देण्यासंदर्भात राजीव प्रताप रुडी यांच्यासोबत मुंबई येथे बैठक घेण्यात येणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याला वैमानिक होण्यासाठी 200 तास फ्लाइंग अवर्स पूर्ण करणे आवश्यक आहेत. मात्र नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे मोठ्या संख्येने होत असलेल्या विमानांच्या आवागमनामुळे वैमानिक प्रशिक्षणासाठी फ्लाइंग अवर्स पूर्ण होण्यास विलंब होतो. त्यामुळे नागपूर येथील फ्लाइंग क्लबसाठी पर्यायी ऑपरेशनल बेस म्हणून वेगळ्या धावपट्टीची गरज आहे. याबाबत चंद्रपुरातील मोरवा विमानतळाचा पर्याय शोधण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना वैमानिक प्रशिक्षणासाठी आवश्यक बाबींची मोरवा येथे पूर्तता करण्यात येत आहे.

याच अनुषंगाने ऑक्टोबर 2023 मध्ये मोरवा विमानतळ येथे विमानाची प्राथमिक चाचणी करण्यात आली होती. फ्लाइंग क्लब संदर्भात अनुषंगिक कामांच्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 10 जानेवारी 2024 रोजी मुंबई येथे बैठक घेतली होती. मोरवा विमानतळावर ज्या तांत्रिक बाबींची पूर्तता अद्याप बाकी आहे, त्या अनुषंगाने महाराष्ट्र विमान प्राधिकरण, विभागीय आयुक्तालय, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद या यंत्रणांनी त्यांना सोपविलेली कामे वेळेत मार्गी लावावीत. भारतीय विमान प्राधिकरणाची (AAI) ज्या बाबींना परवानगी आवश्यक आहे, ती मिळण्याबाबत तात्काळ पाठपुरावा करावा. तांत्रिक मान्यतेच्या अनुषंगाने ज्या बाबींची पूर्तता करण्याबाबत भारतीय विमान प्राधिकरणाने कळविले आहे, त्या बाबी पूर्ण कराव्यात, अशा सूचना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या होत्या.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!