Rain Hits Orange City : अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस शनिवारी (ता. 20) पहाटे ऑरेंज सिटी नागपूरमध्ये परतला. हा पाऊस अशा दमदार स्वरूपात परतला की भारतीय मौसम विभागाला (IMD) ऑरेंजसिटीलाच ऑरेज अलर्ट द्यावा लागला. सुमारे सात तासात सव्वा दोनशे मिलिमीटर पाऊस झाला. सकाळी साडेआठ ते साडे अकरा या दोन तासातच 135.6 मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. या पावसाने नागपूरकरांची दाणादाण उडाली. महापालिकेची पोलखोल केली आणि बचावासाठी धावाधाव करणाऱ्या अनेकांच्या तोंडाला फेस आणला.
नागपुरातील सांडपाण्याचा निचरा व्हायला सक्षम ड्रेनेज व्यवस्थाच नसल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. पावसामुळे शहरातील बहुतांश रस्ते ठप्प झालेत. अनेक वस्त्या पाण्याखाली गेल्या. विद्यार्थी अडकून पडले. आता या विषयावरून राजकारण चांगलेच तापणार आहे. पावसाच्या पाण्याने नागपूर पोलिसांनाही फटका दिला. वर्धा मार्गावर सोनेगाव पोलिस स्टेशन आहे. पोलिस स्टेशनच्या जवळच आशियातील सर्वांत लांब उड्डाणपूल संपतो. आशियात विक्रम प्रस्थापिक करणाऱ्या या पुलावरील पावसाच्या पाण्याचे सोनेगाव पोलिसांनी शनिवारी चांगलेच सळो की पळो करून सोडले.
पाणी जाणार कुठे?
उड्डाणपुलाचा उतार सोनेगाव पोलिस ठाण्याच्या जवळ येतो. त्यामुळे पुलावरील व त्याच्याही वर असलेल्या मेट्रो पुलावरील पाणी सहाजिकच सोनेगाव पोलिस स्टेशनजवळ वाहून येते. हे पाणी वाहून जाण्यासाठी ड्रेनेजच करण्यात आलेले नाही. त्यामुळे पुलावरील पाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात घुसले. संततधार पाऊस आणि पुलावरून खाली येणाऱ्या पाण्यामुळे परिसर तुडुंब भरला. पाण्याला वाट मिळेल त्या दिशेने ते वाहू लागले. अशातच हे पाणी काही क्षणातच सोनेगाव पोलिस स्टेशनमध्ये शिरले. बघता बघता काही मिनिटांतच गुडघ्यावर पाणी पोलिस ठाण्यात भरले.
पोलिस ठाण्यात चारही बाजूने पाणीच पाणी झाले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक कक्षात पाणी. पोलिस स्टेशनच्या स्वागत कक्षात पाणी. वायरलेस कक्षात पाणी. आरोपी ठेवायच्या कोठडीत पाणी. जिकडे बघावे तिकडे पाणीच पाणी साचले. परंतु अशातही सोनेगाव पोलिसांनी आपल्या कर्तव्यातून पळ काढला नाही. जमिनीवर पाय ठेवायलाही जागा नसल्याचे सोनेगाव पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी अखेर खुर्च्यांवर चढले. फोन, वायरलेस सेट, पोलिस स्टेशनमधील कागदपत्र, डायऱ्या, फाइल्स, संगणक असे साहित्य त्यांनी सगळ्या आधी सुरक्षित केले. अनेक तासापर्यंत सोनेगाव पोलिस स्टेशनमध्ये अधिकारी, कर्मचारी ना बाहेर येऊ शकत होते, ना कोणी आत जाऊ शकत होते. त्यामुळे पाण्याचा वेढा कमी होईपर्यंत पोलिसही अडकून पडले होते.
पोजीशन केव्हा होणार कंट्रोल?
पोलिस नियंत्रण कक्ष जेव्हा कोणत्याही ठाण्याची संपर्क साधतो तेव्हा कंट्रोल टू अमूक अमूक पीएस (पोलिस स्टेशन) अशा सांकेतिक वाक्याचा उपयोग केला जातो. शनिवारी पाण्याचा वेढा असल्यामुळे बिचाऱ्या सोनेगाव पोलिसांना कदाचित ‘सोनेगाव पीएस टू कंट्रोल..! पोजीशन अंडर वॉटर’ असे म्हणण्याची वेळ आली असावी. नागपूरला चौफेर विकास झाला. आशियातील सगळ्यात लांब आणि भव्यदिव्य पूलही नागपुरात उभारला गेला. परंतु नदी, समुद्र नसतानाही नागपुरात महापूर येऊ शकतो, याचा विसर कदाचित साऱ्यांनाच पडला. गेल्या काही वर्षात नागपुरात महापूर येण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस हे दोन ‘हेवीवेट’ नेते नागपूरचा चेहरा आहेत. योगायोगाने फडणवीस हेच गृहमंत्री, उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री आहेत. अशात त्यांच्यात गृहशहरातील, गृहखात्याच्या पोलिसांची स्थिती ‘अंडर वॉटर’ येणे योग्य संकेत नाही. त्यामुळे नागपुरातील ही ‘पोजीशन’ आता या दोन्ही नेत्यांना ‘कंट्रोल’ करावीच लागणार आहे.