जयेश गावंडे
Lok Sabha Election लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदान काल आटोपले. त्यामुळे राज्यातील राजकीय नेत्यांना काही दिवस विश्रांती मिळाली असली तरी निकालाच्या उत्सुकतेबरोबरच धाकधूकही वाढणार आहे. 4 जूनला लोकसभेचा निकाल लागणार आहे. त्यामुळे निकालाची तारीख जशी जवळ येईल तशी कोण विजयी होणार याविषयीची उत्सुकता शिगेला पोहचणार आहे.
निकालापर्यंत आता आपलाच उमेदवार विजयी होणार यावर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांत पैजा लागत आहेत. सट्टा बाजारातही आता मोठ्या प्रमाणात उलाढाल होण्याची शक्यता आहे.
16 मार्चला निवडणूक जाहीर झाली. लोकसभा निवडणुकीच्या एकूण सात टप्प्यांपैकी पाच टप्प्यात राज्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या मतदारसंघात निवडणूक झाली. दुसरा टप्पा 26 एप्रिलला झाला. यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी मध्ये मतदान झाले. तिसरा टप्पा 7 मे रोजी पार पडला. यामध्ये रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघात निवडणूक झाली. तर चौथा टप्पात 13 मे रोजी झाला. यामध्ये नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघात. आणि पाचवा टप्पा 20 मे रोजी पार पडला. यात धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान झाले. अशा एकूण 48 मतदारसंघात अटीतटीच्या लढती पाहायला मिळाल्या.
आता लक्ष निकालाकडे!
निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक पक्षातील काही मतदारसंघात जागावाटपाचा तिढा शेवटपर्यंत सुटला नाही. अखेरच्या क्षणी निर्णय घेत तिढा सोडवण्यात आला. काही अपवाद वगळता निवडणूक शांतपणे पार पडली. राज्यात अनेक हाय व्होल्टेज लढतीही झाल्या. अनेक ठिकाणी मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली. भाजपकडून राज्यात मिशन 45 चा दावा करीत जोरदार प्रचार करण्यात आला. तर, महाविकास आघाडीकडूनही आरोप प्रत्यारोपाच्या फैरी विरोधकांवर झाडण्यात आल्या. आता लक्ष निकालाकडे आहे.
Anticipatory Bail : साजिद खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ‘या’ तारखेला सुनावणी!
यशाचे दान कोणाला
भाजपला अपेक्षित यश मिळते की महाविकास आघाडीला मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तर कमी मतदानाचा नेमका कुणाला फायदा होतो हेही पाहावे लागणार आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, शरद पवार यांची राष्ट्रवादी या पक्षांना सहानुभूती मिळते का हे ही पाहावे लागणार आहे. देशाचं नवं सरकार ठरविण्यासाठी राज्यातील 48 जागा कोणाच्या पदरात पडतात. हे 4 जूनला स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी जय पराजयाच्या गप्पा मात्र रंगणार आहेत.
सट्टा बाजार तेजीत येण्याची शक्यता!
निवडणूक म्हटली की, कुण्या एकाचा विजय आणि बाकीच्यांचा पराजय होणारच. हार जीतच्या या लढाईत सट्टा बाजार चालविणाऱ्यांची मात्र चांदी असते. निकालाला 13 दिवस आहेत. या दरम्यान सर्वच मतदारसंघात सट्टा बाजार मोठ्या प्रमाणात चालणार आहे. याकडेही उमेदवारांसह राजकीय नेत्यांचे लक्ष लागून राहणार आहे.