Maharashtra Government : हिवाळी अधिवेशनाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी नागपुरात पाच दिवसांचे अधिवेशन घेण्यात येणार आहे. 16 ते 21 डिसेंबर या काळात हे अधिवेशन होणार आहे. त्यामुळं पाच दिवसांसाठी कोट्यवधी रुपये खर्च होणार आहेत. राज्यात महायुतीचं सरकार येऊन अवघे पाच दिवस झाले आहेत. 5 डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. त्यानंतर आता विधिमंडळाचे विशेष अधिवेशन मुंबईत सुरू आहे. त्यानंतर नागपुरात हिवाळी अधिवेशन होणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन केवळ औपचारिकता ठरत आहे. अधिवेशन अक्षरश: उकले जाते. विदर्भातील प्रश्नांवर खरोखर चर्चा होते काय, असा प्रश्न यामुळं उपस्थित झाला आहे. यंदा सरकार नवीन असल्याचं कारण पुढं करून पाचच दिवसांचं अधिवेशन घेण्यात येत आहे. अधिवेशनासाठी संपूर्ण राज्य सरकार नागपुरात येणार आहे. मंत्रालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी देखील नागपुरात मुक्कामी असतील. पंरतु पाच दिवसांचे अधिवेशन असल्यानं यातून विदर्भाच्या हाताला काही लागण्याची शक्यता कमीच आहे.
नवे मंत्री येणार
मुंबईतील विशेष अधिवेशनानंतर राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यानंतर लगेचच अधिवेशन होणार आहे. 12 डिसेंबरच्या आसपास मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यानंतर संपूर्ण मंत्रिमंडळ नागपुरात मुक्कामी येणार आहे. या अधिवेशनात तांराकित प्रश्नालाही फाटा देण्यात आला आहे. पुन्हा पाच वर्षांनंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे अधिवेशनात दिसणार आहेत. सरकार सत्तारूढ झाल्यावर व मंत्री मडळाचा शपथविधी झाल्यावर कामकाज सल्लागार समितीची बैठक होईल.त्यांनतर अधिवेशन किती काळ चालेल हे स्पष्ट होईल.पण सध्यातरी पाच दिवसाचे हिवाळी अधिवेशन असेल असे प्रशासनाने सांगितले.
अधिवेशनामुळं मंत्र्यांचा बंगल्यावरील देखभाल दुरुस्तीवर खर्च करण्यात येत आहे. ही कामं करण्यासाठी निकृष्ट दर्जाची होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अधिवेशनाच्या निमित्तानं अनेक लोकप्रतिनिधी परिवारासह येतात. त्यांच्या राहण्याचा व फिरण्याचा खर्च सरकारी तिजोरीतून केला जातो. यंदाही तेच होणार असल्याचं दिसत आहे. त्यामुळं विदर्भातील हिवाळी अधिवेशन केवळ औपचारिकता ठरणार आहे. हिवाळी अधिवेशनात विदर्भाचे प्रश्न सुटावे, त्यावर विधिमंडळात चर्चा व्हावी म्हणून दरवर्षी विधिमंडळाचे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन घेतले जाते. पण आता एका आठवड्याच्या अधिवेशनात विदर्भातील प्रश्न मार्गी लागणार का? असा सवाल विदर्भातील जनतेचा करत आहे.