Maharashtra Politics : महायुतीमधील उमेदवारांच्या नावांची पहिली यादी ऑगस्ट अखेरीस जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजपकडून जागा वाटपाचे सर्वाधिकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोपविण्यात आले आहे. त्यामुळे भाजपकडून फडणवीस हेच वाटाघाटी करणार आहेत. शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार हेच अंतिम निर्णय घेतील. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी 150 मतदारसंघांसाठी भाजप आग्रही आहे. त्यामुळे काही मतदारसंघात महायुतीमधील तीनही पक्षात ओढाताण दिसणार आहे.
ज्याचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री असा युतीत अलिखित करार आहे. त्यामुळे सहाजिकच भाजपला 150 जागा मिळाल्यास या पदावर भाजपचाच दावा राहणार आहे. उर्वरित 138 जागांवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक लढवावी लागणार आहे. महायुतीचा विचार केल्यास विदर्भात भाजपचा जोर आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची बऱ्यापैकी चलती आहे. उर्वरित भागांमध्ये शिवसेनेचे वर्चस्व आहे. त्यामुळे जागा वाटप करताना प्रदेशनिहाय पक्षाचे बलाबल देखील पाहिले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
जास्त जागांसाठी चढाओढ
सद्य:स्थिती शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला शंभरपेक्षा जास्त जागांची अपेक्षा आहे. मात्र भाजपने दीडशे जागांचा आग्रह कायम ठेवल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघांच्या वाट्याला प्रत्येकी 69 जागा येणार आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह अनेक आमदार भाजपसोबत आलेत. त्यानंतर भाजपने शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिले. सुमारे अडीच वर्षे शिंदे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे निवडणुकीनंतर शिंदे हेच मुख्यमंत्री राहावे अशी शिवसेनेची इच्छा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचाही हाच ‘टोन’ आहे. अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावे, अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसही निवडणुकीसाठी 90 जागांची मागणी करणार आहे. मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी ही माहिती दिली. त्यामुळे भाजपला या दोन्ही पक्षाांना नाराज न करता दीडशेचा आग्रह कायम ठेवावा लागणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 105 तर शिवसेनेने 56 जागांवर विजय मिळविला होता. काँग्रेसने 44 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 54 जागांवर यश मिळविले. त्यावेळी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अविभाजित होते.
प्रदेशनिहाय बलाबल
गेल्या निवडणुकीचा विचार केल्यास भाजपने विदर्भ, मराठवाडा, मुंबई, उत्तर महाराष्ट्रात बऱ्यापैकी जागांवर विजय मिळविला. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचेचे वर्चस्व कायम होते. काँग्रेसला मात्र त्यावेळी फार मुसंडी मारता आली नाही. परंतु शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमधील विभाजन आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर राजकीय परिस्थितीत बदल झाला आहे. त्यामुळे जागा वाटप करताना महायुतीमधील तीनही पक्षाच्या नेत्यांना हे कसब फारच काळजीपूर्वक करावे लागणार आहे.