Maharashtra Politics : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची एकहाती सूत्र भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांभळत आहेत. अशात भाजपची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर नाराजांच्या लाटा येऊ लागल्या आहेत. त्यामुळे अनेकांना आता ‘सागर किनारे दिल ये पुकारे.. तू जो नही तो मेरा कोई नहीं है..’ हे गीत आठवू लागलं आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत फडणवीस हेच उमेदवारांची नावं फायनल करीत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे पहिली यादी जाहीर झाल्यानंतर आणि दुसरी जाहीर होण्यापूर्वी फडणवीसांच्या ‘सागर’ला भरती आली आहे.
फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर ..
यापूर्वी भाजपची सगळी सूत्रं पक्षाच्या मुख्यालयातून चालत होती. परंतु आता फडणवीस यांच्या सागर बंगल्याला महत्व आलं आहे. तिकीट इच्छूक, नाराज आणि तिकीट मिळालेले सर्वच लोक देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहचत आहेत. यातील सर्वाधिक गर्दी ही मुंबई, पुण्यातील नेत्यांची आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील नेत्यांची संख्या त्यात तुलनेने कमी आहे. फडणवीस नियमितपणे नागपुरात मुक्कामी असतात. त्यामुळे विदर्भातील बहुतांश नेते फडणवीस यांची भेट घ्यायची असल्यास नागपुरातीलच ‘टायमिंग’ साधतात.
अनेक मध्यस्थ
विदर्भातील अनेक नेत्यांसाठी फडणवीस आणि त्यांच्यात अनेक दुवे आहेत. चंद्रशेखर बावनकुळे, संदीप जोशी, विक्की कुकरेजा, प्रवीण दटके असे अनेक नेते सतत फडणवीसांच्या संपर्कात असतात. मात्र मुंबई, पुण्यातील नेत्यांना मुंबईतच फडणवीस यांना संपर्क साधावा लागतो. त्यामुळे अनेक नेते आतापासून ‘सागर किनारे’ बसून आहेत. निवडणुकीचा काळ असल्याने मुंबईतील सागर आणि नागपुरातील देवगिरी हे दोन्ही बंगले सध्या गर्दीने फुलले आहेत. सोमवारी बबनराव पाचपुते, प्रतिभा पाचपुते, भारती लव्हेकर, भीमराव तापकिर, बाळा भेगडे, सुनिल राणे, अतुल शाह आदी अनेक नेते ‘सागर’वर ठाण मांडून होते.
भाजपनं यादी जाहीर करताच काही ठिकाणी बंडाची ठिणगी पडली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांना कोथरुडमधून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. येथे पाटील यांच्या नावाला विरोध आहे. मात्र त्यानंतरही पाटील यांना कोथरूडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. मुळे भापजचे स्थानिक नेते अमोल बालवडकर बंडखोरी करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. श्रीगोंदा मतदारसंघात बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुतेंना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळं सुवर्णा पाचपुते यांनी आपल्या कार्यालयातील भाजप नेत्यांचे फोटो आणि चिन्ह हटवले आहे.
माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी
राहुरी विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे पूत्र सत्यजित कदम हे देखील राहुरी मतदारसंघांसाठी इच्छुक होते. त्यामुळं ते नाराज झाले आहेत. विदर्भातही काही नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. टेकचंद सावरकर यांची उमेदवारी नाकारण्यात आली आहे. आमदार विकास कुंभारे यांचं नावही होल्डवर आहे. त्यामुळं नेते सावध पवित्रा घेत प्रतिक्रिया देत असले तरी त्यांची अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळं फडणवीसांचा ‘सागर’ अश्विन महिला अमावस्येकडे जात असतानाही नाराज, इच्छुकांच्या लाटांनी चिंब झाला आहे.