Clash In BJP : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अविश्वास सभेच्या पूर्वीच हाय होल्टेज ड्रामा झाला. पोलिसांसोबत बाचाबाची झाली. बाजार समिती प्रवेशद्वार समोर घोषणाबाजी रंगली. अंगरक्षकांची गुंडागर्दी, जमावबंदी कायद्याचे उल्लंघन झाले. आता याप्रकरणी मालकपूरचे माजी आमदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चैनसुख संचेती व खासगी अंगरक्षकासह 29 जणांविरुद्ध मलकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीवर भारतीय जनता पक्षाच्याच एका गटाने अविश्वासचा प्रस्ताव आणला. जिल्हाधिकारी यांच्याकडे हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्याचा निकाल शुक्रवारी लागला. त्यावरून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपच्या दोन गटांमधील वाद उफाळून आला आहे. बाजार समितीच्या संचालक निवडणुकीत भाजपने माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता मिळवली. मात्र आता याच संचालक मंडळात दोन गट पडले आहेत.
तायडे विरुद्ध संचेती
विद्यमान सभापती शिवचंद तायडे यांच्या विरोधात 13 विरुद्ध 4 असा अविश्वास चैनसुख संचेती गटाने दाखल केला. हा प्रस्ताव 13 विरुद्ध 02 अशा मतांनी पारित झाला. त्यामुळे सभापती शिवचंद तायडे यांना पायउतार करण्यात आले. निकाल ऐकण्यासाठी बाजार समिती परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. यामुळे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या समर्थकांनी बाजार समितीच्या प्रवेश द्वारासमोर घोषणाबाजी केली. कायद्याचे उल्लंघन केले. पोलिसांनी शांततेच्या आवाहन करून सुद्धा घोषणाबाजी सुरूच ठेवली.
Buldhana Constituency : महायुतीच्या विजयाचा चौकार की मविआची एन्ट्री?
याप्रकरणी पोलिस कर्मचारी मनोज उमाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. माजी आमदार चैनसुख संचेती, यश सुरेशकुमार संचेती, राहुल ऊर्फ बबलू देशमुख, अतुलसिंह प्रतापसिंह राजपूत, संदीपसिंह नारायणसिंह राजपूत, शुभम संजय काजळे, ऋषिकेश ज्ञानदेव वाघोदे, करणसिंह राजपूत, चंद्रकांत वर्मासह इतर 15 ते 20 बाउन्सरविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला.
तायडे गटावरही कारवाई
मावळते सभापती शिवचंद तायडे यांच्या गटावरही विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जमावबंदी आदेश मोडल्याचा हा गुन्हा आहे. गैरकायद्याची मंडळी जमविणे, वाहन अडविणे, धक्काबुक्की, दगडफेक असे आरोप आहेत. या घटनेत दंगा काबू पथकातील पोलिस कर्मचारी शेख फैजल शेख खलील, संचिन संजय कवळे, प्रकाश भगवान जाधव जखमी झाले होते. विजय कडू पाटील, अजय तायडे, केशव गारमोडे, अमोल तायडे, चंद्रशेखर तायडे, शंभू तायडे, राजू तायडे, सागर जैस्वाल, राहुल घाटे आदींवर ही कारवाई करण्यात आली आहे.