Poor Construction : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला आहे. याप्रकरणी पुतळा उभारणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) यांसदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. गेल्यावर्षी नौदल दिनाचे औचित्य साधून पूर्णाकृती पुतळा मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते या पुतळ्याने अनावरण करण्यात आले होते.
राजकोटवर 15 फूट उंचीचा चबुतरा आणि 28 फूट उंच शिवरायांचा पुतळा अशी येथील रचना होती. गेल्या आठ महिन्यांत पर्यटकांचे तसंच शिवप्रेमीचं आकर्षण केंद्र बनला होता. मात्र सोमवारी (ता. 26) दुपारी अचानक पुतळा कोसळला. याप्रकरणी कंत्राटदार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भ्रष्टाचार, फसवणूक आणि सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आणणे आदी कलमांचा यात समावेश आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या तक्रारीत बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा दावा करण्यात आला आहे.
गंजलेले नटबोल्ट
पुतळा उभारण्यासाठी वापरण्यात आलेल्या रचनेत कंत्राटदार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांनी गंजलेले नटबोल्ट वापरल्याचे पुढे आले आहे. बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले. लोकार्पण झाल्यानंतर काही दिवसातच पुतळ्याच्या दूरवस्थेबाबत चिंता व्यक्त होत होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने पावले उचचली. मालवण विभागाच्या सहाय्यक अभियंत्याने 20 ऑगस्टला यासंदर्भात इशारा पत्र दिले. त्यात गंजलेले नट आणि बोल्ट वापरल्याने पुतळ्याला धोका असल्याचे म्हटले होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या पत्राकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे पुतळा आठ महिन्यातच कोसळला. पुतळा बनवताना वापरलेले स्टील गंजू लागले होते. पुतळ्याला गंज लागल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याने नौदलांच्या अधिकाऱ्यांना दिली होती. यासंदर्भात तत्काळ उपाय करण्याची विनंतीही केली होती. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमार कौशल्याचा गौरव करण्यासाठी हा पुतळा उभारण्यात आला होता.
पुतळा कोसळल्यानंतर विरोधकांनी थेट महायुती सरकावर हल्लाबोल केला. त्यानंतर सरकारने हा पुतळा नौदलाकडून उभारण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुतळा पुन्हा उभारण्यात येईल, असे जाहीर केले. दोषींवर कारवाईही करण्यात येईल, असेही शिंदे यांनी जाहीर केले. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर लगेचच बांधकाम विभागाने पोलिसांत तक्रार दाखल केली. शिवसेना (Shiv Sena) उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी मालवणच्या बांधकाम विभाग कार्यालयात तोडफोडही केली. त्यामुळे तणावात भर पडली.