POCSO Act : कोलकाता, मुंबईतील बदलापूर, कोल्हापूर, पुणे, अकोल्यातील अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. बदलापूर येथे दोन शालेय विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाऱ्याच्या घटनेबद्दल संपात व्यक्त होत आहे. मुली-महिला यांच्यावर अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. बालिकाही सुरक्षित नसल्याचे ताशेरे हायकोर्टानेही ओढले आहेत. अशात गोंदिया येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली आहे. गोंदिया जिल्ह्यातील देवरी पोलिस ठाण्याअंतर्गत हा प्रकार घडला आहे. यात 13 वर्षीय विद्यार्थिनीचा दोनदा विनयभंग करण्यात आला. अल्पवयीन विद्यार्थिनी शाळेत जात असताना तिला रस्त्यात 21 वर्षाचा तरुण अडवत होता.
या तरुणाने तिच्यासोबत दोनदा असभ्य वर्तन केले. रस्त्याने जात असताना तो तिला मोबाइल दाखवत होता. मुलीने त्रासाला कंटाळत शाळेतील शिक्षकांना घडलेल्या प्रकार सांगितला. शिक्षकांनी तात्काळ पोलिसांमध्ये तक्रार केली. राज्यात मुलींवर अत्याचाराच्या घटना लक्षात घेता गोंदियाचे पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी शाळेत जात आरोपीला अटक केली. त्याच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला. पोलिस तपासात मुलीचा विनयभंग झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पोलिसांनी आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दामिनी पथक सक्रिय
गोंदिया जिल्ह्यात दामिनी पोलिस पथक महिलांना मार्गदर्शन करणार आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा-कॉलेजेसमध्ये पथक जाणार आहे. तेथील विद्यार्थिनींशी ते संवाद साधणार आहेत. याशिवाय तरुणी किंवा महिलांची छेड काढण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाही दामिनी पथक आणि गोंदिया पोलिसांच्या कारवाईचा सामना करावा लागणार आहे. राज्यात पुन्हा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सर्व शाळांमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी होणार आहे. त्यासाठी शासन निर्णय (GR) काढण्यात आला आहे. राज्यातील शाळांमधील शिपाई ते मुख्याध्यापक सर्वांची पोलिस चारित्र पडताळणी केली जाणार आहे. अशात राज्यात रोज नवनवीन घटना उघडकीस येत आहेत. त्यामुळे विकृतीवर अंकुश कसा मिळवायचा, असा कायम आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणा बरोबरच त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अलिकडच्या काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही अनुचित घटना घडल्याने राजकीया वातावरणही तापले आहे. त्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न सध्या चांगलाच चर्चेत आहे. या प्रकाराची शासनस्तरावर गंभीर दखल घेण्यात आली आहे. यावर उपाय योजना करताना सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. शाळा आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सुरक्षा रक्षक, सफाईगार, मदतनीस, स्कुलबसचे चालक इत्यादी व्यक्तींच्या चारित्र्य पडताळणीचा अहवाल पोलिस यंत्रणेकडून मिळवावा लागणार आहे. हा अहवाल अत्यावश्यक असेल. शाळांमध्ये तक्रार पेटींचा देखील प्रभावीपणे वापर करावा लागणार आहे. महिला सुरक्षा संदर्भातील समितीच्या तरतुदींचे पालनही करावे लागणार आहे.