महाराष्ट्र

Assembly Session : संविधान हातात घेत पटोले, वडेट्टीवार, राऊत यांची शपथ

Congress : महाविकास आघाडीचे नेते नरमले

Oath Ceremony : विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात अखेर महाविकास आघाडीचे नेते नरमले आहेत. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानसभेचे सदस्य म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, डॉ. नितीन राऊत यांनी संविधान हातात घेत सदस्य पदाची शपथ घेतली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शपथविधीवर बहिष्कार घातला होता.

महाविकास आघाडीने बहिष्कार घातल्यानंतर काही सदस्यांनी शनिवारी शपथ घेतली होती. याशिवाय महाविकास आघाडीतील समाजवादी पार्टीने बाहेर पडत शपथ घेतली होती. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याचे दिसून आले. तांत्रिकदृष्ट्या जोपर्यंत नवनिर्वाचित उमेदवार शपथ घेत नाही तोपर्यंत असा उमेदवार विधानसभेचा सदस्य नसतो. त्यामुळे सदस्य पदाचे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीला मिळत नाही.

भाजपकडे मागणी 

शपथ घेतली नाही तर विधानसभेचे कोणतीही अधिकार मिळणार नाही हे महाविकास आघाडीतील नेत्यांना माहिती होते. त्यामुळे त्यांनी कायदेशीर प्रक्रिया पार पाडली. पहिल्या दिवशी बहिष्काराचा स्टंट मात्र केल्याची टीका आता त्यांच्यावर होत आहे. विधानसभेतील शपथविधीनंतर आता महाविकास आघाडीने विरोधी पक्षनेते पद मिळावे अशी मागणी केली आहे. सध्या महाविकास आघाडी मधील कोणत्याही पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी संख्या नाही.

पुरेसे संख्याबळ नसल्याने महाविकास आघाडीने विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी विनंती केली आहे. विधानसभेतील अध्यक्षांनी निर्णय घेतला तर विरोधी पक्षनेतेपद महाविकास आघाडीला देता येईल. यासंदर्भात आमच्याकडून कोणतीही आडकाठी करण्यात येणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच स्पष्ट केले होते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. या संदर्भात आता सरकार आणि विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Rohit Babar : 34 वर्षांनी पुन्हा जुळून आला योगायोग!

उर्वरितांचा शपथविधी 

विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बहुतांश सदस्यांना शपथ देण्यात आली. शपथ घेण्याचा रविवारी दुसरा आणि शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वच आमदारांनी शपथ घेतली. या शपथविधी प्रक्रियेतील आगळेवेगळेपण चर्चेचा विषय ठरले. कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केला. कोणी संस्कृत मधून शपथ घेतली. कोणी पायातील चप्पल काढत प्रक्रिया पार पडली. कोणी विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक होत प्रवेश केला. त्यामुळे हे विशेष अधिवेशन लक्षवेधी ठरले.

या अधिवेशनानंतर आता कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यानंतर उपराजधानी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली आहे. अधिवेशनासंदर्भातील सूचना लवकरच काढण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर हिवाळी अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. डिसेंबरच्या मध्यावधीत हे अधिवेशन होणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!