Shocking Incident : महाराष्ट्र शासनाने राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना प्रत्येक महिन्याला 1 हजार 500 रुपये दिले जाणार आहेत. हे पैसे थेट लाभार्थी महिलांच्या खात्यावर (DBT) पाठवले जातील. या योजनेसाठी काही कागदपत्रांची पूर्तता करणं आवश्यक आहे. योजनेसाठी आपली बहिणी पात्र ठरावी, म्हणून दाखला आणायला गेलेल्या तरुणाला सरपंच महिलेने कानशिलात लगावल्याची घटना घडली.
ग्रामपंचायतीत हा तरुण दाखला आणायला गेला होता. मात्र सरपंच महिलेने तरुणाला मारहाण केली. आता या सरपंच महिलेविरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेसाठी दाखले, कागदपत्र गोळा करण्यासाठी महिला व त्यांचे नातेवाईक धावपळ करीत आहेत. गोंदिया तालुक्यातील नवेगावबांध ग्रामपंचायत कार्यालयात जन्माचा दाखला मागण्यासाठी एक युवक पोहोचला. या युवकांने महिला सरपंचाकडे जन्म तारखेच्या दाखल्याची मागणी केली.
मारहाणीचा प्रकार
ग्रामपंचायतमध्ये आलेल्या युवकाला महिला सरपंचाने मारहाण केली. युवकांच्या थेट कानशिलात हाणल्याची घटना घडली. मारहाण करणाऱ्या नवेगावबांध ग्रामपंचायतच्या महिला सरपंचाचे नाव हिराबाई नीलमचंद पंधरे असे आहे. आशिष सुभाष लंजे (वय 20) हा युवक दाखला मागण्यासाठी गेला होता. त्याला पैशाचा हिशोब न दिल्याचे कारण पुढे करुन सरपंच हिराबाई पंधरे यांनी मारहाण केली. आशिष लंजे हा नवेगावबांध येथील रहिवाशी आहे. या घटनेमुळे नवेगावबांध गावात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण आता पोलिसांपर्यंत पोहोचले आहे.
नवेगावबांध येथील ग्रामपंचायत वन समितीच्यावतीने राष्ट्रीय उद्यानाच्या हिलटॉप गार्डनवरती संबधित तरुण काम पाहत होता. येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांकडून प्रवेश पास देऊन पैसे गोळा करण्याचे कार्य करीत होता. काही दिवसाआधी आशिष लंजे याला कामावरून काढण्यात आले होते. सरपंच हिराबाई पंधरे यांना आशिष लंजे यांनी पैशाचा हिशोब दिला नव्हता. यातूनच पंधरे यांनी आशिषला कानशिलात लगावल्याचे पोलिसांनी सांगितले.
आशिषने दिलेल्या तक्रारीच्या आधारे सरपंच हिराबाई पंधरे यांच्या विरोधात नवेगावबांध पोलिसांनी भारतीय न्याय संहितेअंतर्गत (BNS) अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. गावात घडलेल्या या प्रकाराची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. या घटनेमागे केवळ हिलटॉप गार्डनच्या रकमेचे कारण आहे, की अन्य काही याचा शोध पोलिस घेत आहेत.