महाराष्ट्र

Mahayuti : ‘लाडकी बहीण’ महायुतीला घालणार का मतांची ओवाळणी?

Assembly Election : मध्य प्रदेशानंतर महाराष्ट्रात खेळले ‘वुमन्स कार्ड’

Maharashtra Politics : लोकसभा निवडणूक संपली. या निवडणुकीत महायुतीला चांगलाच फटका बसला. ‘45 प्लस’चा दावा करणाऱ्या भाजपला फारच मोजक्या जागांवर समाधान मानावे लागले. आता अवघ्या काही महिन्यांतच राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) फटका बसल्यानंतर महायुतीने आता महत्त्वाच्या ‘व्होटबँक’कडे लक्ष वळवलं आहे. ते म्हणजे महिला ‘व्होटबँक’. याची झलक अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातून दिसली. राज्यात सध्या नव्याने सुरुवात झालेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेची प्रचंड चर्चा सुरू आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ‘लाडकी बहीण’ महायुतीला मतांची ओवाळणी घालणार का हे पाहावे लागणार आहे.

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुतीतील पक्षाकडून अनेक जागा मिळणार चे असे दावे मोठ्या प्रमाणात करण्यात आले. ‘एक्झिट पोल’मधून महायुतीसह भाजपला चांगल्या जागा मिळणार असल्याचे भाकीत करण्यात आले होते. भाजपने तर राज्यात ‘45 प्लस मिशन’ राबवून अनेक दावे केले. मात्र निकालात झाले काही वेगळेच. महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. महायुतीला केवळ 17 जागांवर समाधान मानावे लागले. महाविकास आघाडीच्या पदरात 31 जागा पडल्या.

महायुतीला फटका

राज्यात महायुतीला मोठा फटका लोकसभा निवडणुकीत बसला. निकालातील फटक्यामुळे महायुती आता खडबडून जागी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे समाजातील सर्वच घटकांतील मतदारांना खूश करण्याचे प्रयत्न आता सरकारकडून अंतिम टप्प्यात केले जात आहे. राज्य विधिमंडळाचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठे निर्णय घेण्यात येत आहेत. अनेक योजना मतदारांच्या पदरात टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यात महिलांवर अधिक ‘फोकस’ आहे. आता सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. त्यानंतर मोफत सिलिंडरची घोषणाही केली. जाहीर केलेल्या योजनांचा फायदा महायुतीला निवडणुकीत होईल का? हे पाहावे लागणार आहे.

मध्य प्रदेशची ‘कॉपी’

मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी त्यांच्या राज्यात ‘लाडली बहन’ ही योजना सुरू केली. त्यामुळे भाजपला मध्य प्रदेशात प्रचंड यश मिळाले. शिवराज सिंह यांना मुख्यमंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्या अनेक बहिणींनी टाहो फोडला. आता ते केंद्रात मंत्री झाले आहेत. याच धर्तीवर महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ जाहीर केली गेली आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने मध्य प्रदेश मध्ये एक विशेष पथक पाठवले होते. या पथकाने योजनेचा अभ्यास केला. सरकारला अहवाल सादर केला. त्यानुसार महायुती सरकारने राज्यात नव्या योजनेची घोषण केली. महाराष्ट्रात ही योजना लागू होताच ही योजना चर्चेत आली आहे.

राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करताच त्याची चर्चा सुरू झाली. 1 जुलै रोजी योजनेची अंमलबजावणी सुरू होताच सुरुवातीला या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांमुळे लाभार्थी महिलांची मोठी दमछाक झाली.

Hathras Case : अंधश्रद्धेचे बळी..कथीत बाबांचे साम्राज्य व्हावे उद्ध्वस्त 

कागदपत्रे काढण्यासाठी मोठी गर्दी महिलांनी सेतू केंद्रासह तलाठी कार्यालयांमध्ये केली. याच गर्दीचा फायदा घेत अनेक ठिकाणी लाभार्थी महिलांची आर्थिक लूट झाली. अनेक ठिकाणी एजंटकडून पैसे उकळण्याचे प्रकार समोर आले.

तलाठ्यांनी याचा आर्थिक फायदा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर व्हिडीओ व्हायरल झाले. अमरावती, बुलढाणा आणि अकोलासह काही ठिकाणी तलाठ्यांवर कारवाई करण्यात आली. दुसरीकडे योजनेच्या घोळावरून विरोधकांना आयते कोलीत मिळाले. विरोधकांनी सभागृहात सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर योजनेतील अनेक अटी रद्द करण्यात आल्या. अद्यापही अनेक ठिकाणी योजनेसंदर्भात घोळ कायम आहे.

महिला मतदारांवर लक्ष!

राज्यात महिला मतदारांची संख्या मोठी आहे. अनेक घरांची जबाबदारी महिलांवर आहे. महिला मतदारांची संख्या लक्षात घेता मतदान विधानसभा निवडणुकीत वाढेल. त्यामुळे अशा योजनेतून महिला ‘व्होटबँक’ आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे. जो महिला मतदारांवर फोकस करेल त्यांला विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळू शकते. त्यामुळेच महायुतीकडून महिला ‘व्होटबँक’ला खूश करण्याचा सर्व प्रयत्न सुरू आहेत.

महाराष्ट्रात जाहीर करण्यात आलेली योजना मध्य प्रदेशमध्ये आधीच लागू आहे. या योजनेचा मोठा फायदा भाजपला मध्य प्रदेशात झाला.

Maratha Reservation : 288 पाडायचे की, उभे करायचे हे ठरवू !

भाजपला विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले. लोकसभा निवडणुकीतही भाजपने सगळ्या जागा जिंकल्या. यात महिला मतदारच निर्णायक ठरल्याचे विश्लेषण आणि आकडेवारीतून पुढे आले आहे. त्यामुळेच महायुतीने तशाच पद्धतीने योजना महाराष्ट्रात आणली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!