आठव्या वर्गातील विद्यार्थी कृष्णा राजेश्वर कऱ्हाळे याच्या खुनाच्या बातमीने हळहळ व्यक्त होत आहे. दोन दिवसांत दोन बालकांचे अपहरण आणि खून झाल्याच्या घटना अनेक प्रश्न उपस्थित करतात. बुलढाणा जिल्ह्यात पोलिसांचा धाक उरलेला नाही का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
चिखली तालुक्यातील अंबाशी येथील अरहानचा खून झाल्याची घटना २३ जुलैला उघडकीस आली. याचवेळी शेगाव तालुक्यातील नागझरी येथील १४ वर्षीय कृष्णाचे २३ जुलै रोजी अपहरण झाले. ट्युशन क्लास आणि शाळेत गेलेला कृष्णा घरी परतला नसल्याची तक्रार शेगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. दरम्यान गुरुवारी (दि.२५) त्याचा मृतदेहच भास्तन येथील बंदीमध्ये (जंगलात) आढळला, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत दोन बालकांचे अपहरण आणि खून झाल्याच्या घटना उघडकीस आल्या. मारेकऱ्यांनी अतिशय निर्दयतेने या बालकांना ठार केल्याने समाजमन हळहळले आहे. शेगाव तालुक्यातील नागझरी येथील १४ वर्षीय मुलगा मंगळवारी २३ जुलै पासून बेपत्ता होता. कृष्णा राजेश्वर कराळे असे मुलाचे नाव असून मंगळवारी सकाळी १० वाजता तो ट्युशन व शाळेसाठी बाहेर पडला. मात्र सायंकाळी शाळा संपल्यावर देखील तो घरी परतला नाही. यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी शोध घेतला. गावात, शाळेच्य परिसरात शोधूनही कृष्णा मिळाला नाही. तो शेगाव येथील बुरुंगले विद्यालयात वर्ग आठवीमध्ये शिक्षण घेत होता.
दरम्यान २३ जुलै रोजी सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी कृष्णाला एक संशयित मोटारसायकल वरून घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झाले. त्यावरून पोलिसांनी त्या संशयिताचे मोबाईल लोकेशन तपासले. त्यावरून गुरुवारी (दि.२५) सायंकाळी गावातीलच रुपेश वारोकार रा. नागझरी याला जळगाव जामोद येथे ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर हा खुनाचा उलगडा झाला. या घटनेत पृथ्वीराज मोरे या युवकाच्या मदतीने हा खून केल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे.
पोतडीत टाकलेला मृतदेह आढळला
१४ वर्षीय कृष्णाचा मृतदेह मित्राच्या मदतीने पोतडीत टाकलेला भास्ताच्या जंगलात आढळला. त्याच्या मृतदेहाशेजारीच त्याची शाळेची बॅग आणि एक लाकडी दांडा असलेला हाथोडा देखील सापडला आहे.
खरे कारण गुलदस्त्यात !
याप्रकरणी दोन्ही आरोपींची कसून चौकशी सुरु आहे. कृष्णाचे अपहरण करुन त्याचा खून का केला? याबाबत अद्याप नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. कौटुंबिक कलह, व्यवहारिक वैमनस्य की आणखी काही कारण यामागे आहे, हे चौकशीअंतीच स्पष्ट होणार आहे.
शवविच्छेदन अकोल्यात !
जळगाव जामोद पोलिसांनी कृष्णाचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथे पाठविला आहे. रात्री उशिरापर्यंत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात मिळणार आहे. रात्रीच शेगाव तालुक्यातील नागझरी या गावात या विद्यार्थ्यावर अंतिम संस्कार पार पडणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
पोलीस स्टेशनमध्ये संतप्त जमाव
या घटनेची माहिती मिळताच नागझरी येथील अनेक नागरिकांनी शेगाव पोलीस स्टेशन येथे धाव घेवून संताप व्यक्त करत घेराव घातला. पोलिसांनी तपासात हलगर्जीपणा केला. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत पोलिसांनी कुठलाच तपास केला नाही. त्यामुळे कृष्णाला जीव गमवावा लागला, असे नागरिकांनी सांगितले आहे. त्यामुळे संतप्त जमावाने शहर पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना जाब विचारला.
पोलीस अधीक्षकांची पोलीस स्टेशनला भेट
हत्या झाल्याचे उघडकीस आल्यानंतर नागझरी आणि शेगावातील मृतकाच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशन परिसरामध्ये एकच गर्दी केली होती. जमावाचा रोष वाढत असल्याने दंगा काबू पथक बोलवण्यात आले. तर घटनेचे गांभीर्य पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे, मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील आदींनी शेगाव पोलीस स्टेशन आणि घटनास्थळी भेट दिली.
नागझरी गावाला पोलीस छावणीचे स्वरूप
शेगाव तालुक्यातील नागझरी या गावाला छावणीचे स्वरुप आले होते. कृष्णा कराळे या विद्यार्थ्याची हत्या झाल्यानंतर आरोपी याच गावातील असल्याने कुठलीही अनुचित घटना घडण्याची शक्यता होती. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने पावले उचलत या गावाला पोलीस छावणीचे स्वरूप दिले आहे. विशेष म्हणजे आरोपी रुपेश वारोकार याच्या घराजवळही पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
शांततेचे केले आवाहन
यावेळी खामगाव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्ष नेते ज्ञानेश्वर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रसेनजीत पाटील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शांताराम दाणे, उमेश पाटील, केशव हिंगणे व इतर काही नेत्यांनी उपस्थित लोकांना शांततेचे आवाहन केले. त्यानंतर गर्दी थोडी कमी झाली.