गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीच्या लाभासाठी गेल्या सात वर्षांपासून प्रतीक्षेत आहेत. 2017 साली ही योजना जाहीर करण्यात आली. या योजनेतून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला, परंतु अजूनही 6.56 लाख शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. यामध्ये गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील अनेक शेतकरी सहभागी आहेत, ज्यांनी 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची अपेक्षा ठेवली होती.
2019 साली सरकार बदलल्यानंतर कर्जमाफी पोर्टल बंद करण्यात आले. त्यानंतर योजनेचे काम थांबले. परिणामी, या भागातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सातत्याने पडणारे दुष्काळ, अस्थिर हवामान आणि महागाईमुळे या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांवर कर्जाचा मोठा बोजा आहे. कर्ज कसे फेडावे, या विनंचनेत शेतकरी सापडले आहेत. कर्जमुक्ती न झाल्यास त्यांच्यावरील कर्जाचा बोझा वाढणार आहे.
नागपूर अधिवेशनातून आशेचा किरण..
मागिल वर्षी नागपूर अधिवेशनात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ अद्याप मिळालेला नाही. यंदा पुन्हा नागपूर अधिवेशन सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या भागातील शेतकऱ्यांना ठोस निर्णयाची अपेक्षा आहे. गोंदिया भंडारा जिल्ह्याचे नेते डॉ. परिणय फुके यांच्याकडून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.
सरकारकडून ठोस कृतीची अपेक्षा..
गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील शेतकरी सरकारच्या आणि विरोधकांच्या उदासीनतेमुळे त्रस्त आहेत. सात वर्षांत तीन मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासने हवेत विरली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. या भागातील शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचा लाभ मिळावा, हीच त्यांची मागणी आहे.