Akola District : पसंतीचे कपाशी बियाणे मिळावे म्हणून जिल्ह्यातील शेतकरी जीवाचा आटापिटा करीत आहेत. 43 अंश सेल्सिअस तापमानात कृषी केंद्रा समोर रांग लागलेली दिसते. अशावेळी शेतक-यांचे समाधान करण्याऐवजी त्यांना कृषी अधिकारी उलट उत्तरे देत असतील तर उद्रेक होणारचं. जिल्हा कृषी विकास अधिकारी मिलिंद जंजाळ यांच्या उत्तराने आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे.
नेमके काय म्हणाले जंजाळ
अकोला तालुक्यातील शेतकरी गोपाल ठाकरे यांनी त्यांना अजित 55 बियाण्यांबद्दल विचारले. तेव्हा मिलिंद जंजाळ म्हणाले, बियाणे संपले आहेत. तसेच बियाणे म्हणजे चाॅकलेट नाही की लगेच आणले. बियाणे तयार व्हायला आठ महिने लागतात. मी गाडीवर आहे ठेवा फोन. काय ही भाषा. ही आॅडिओ क्लीप चांगलीच व्हायरल झाली. शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.
बियाण्यांचा काळाबाजार?
शेतकऱ्यांना एकीकडे बियाणे उपलब्ध होत नाही आणि दुसरीकडे बियाण्यांची जादा दराने विक्री होत असल्याची ओरड सुरू आहे. 850 रुपयांची बॅग 1200 रुपयाला विकली जात असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.
बियाणे संपले
अजित 55 बीजी 2 आणि अजित 5 बीजी 2 बियाणे संपल्याचे पत्र जिल्हा कृषी व्यावसायिक संघाने 29 मे रोजी दिले आहे. शेतकरी बियाण्यांची मागणी करीत आहे. शासकीय यंत्रणा हतबल दिसते. अशा वेळी सुवर्ण मध्य कसा निघेल हा यक्ष प्रश्न आहे.
शेतकरी ताटकळत बसतात
खरीपाची तयारी आणि त्याचवेळी बियाण्यांचा तुटवडा अशा कात्रीत शेतकरी सापडला आहे. बियाणे मिळावे म्हणून कृषी केंद्रा समोर भाबडी आशा ठेवून शेतकरी उभे राहतात. परंतु रित्या हाताने त्यांना परत जावे लागते.
शेतक-यांचे समाधान करा
शेतकरी खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच अडचणींचा सामना करीत आहे. अशा वेळी शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना व्यवस्थित उत्तरे देणे अपेक्षित आहे. परंतु अनुभव चांगला नाही. बियाणे मिळत नसल्याची उद्विग्नता आणि दुसरीकडे अधिकाऱ्यांची उलट उत्तरे असा दुहेरी मार सहन करावा लागत आहे असे शेतकरी जागर मंचचे मनोज तायडे म्हणाले.