Maharashtra Politics : महायुती, महाविकास आघाडी यांची स्पर्धा सुरू असताना शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी 25 जागा लढविण्याचा निर्धार केला आहे. अशात तुपकर यांना सोबत घेण्याचा सल्ला शरद पवार यांनी महाविकास आघाडीमधील नेत्यांना दिला आहे. तुपकर काँग्रेसकडे जाणार नाही, हे लक्षात आल्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाने त्यांना वेगवेगळ्या ‘ऑफर’ दिल्या आहेत. मात्र कोणत्याही पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढविल्यास शेतकरी चळवळीचे अस्तित्व संपण्याची भीती तुपकर यांना सतावत आहे. त्यामुळे त्यांनी अद्याप सगळे पर्याय खुले ठेवत पुढे येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीचा ‘सामना’ करण्याची तयारी ठेवली आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतरही तुपकर यांचे अद्याप काहीही ठरेनासे झाले आहे. लोकसभा निवडणुकीत तब्बल अडीच लाखावर मतदान तुपकर यांनी मिळविले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत 25 जागांवर तुपकर आणि त्यांचे समर्थक लढले तर मतांचे विभाजन अटळ आहे. त्याचा फटका आपल्यालाच बसेल हे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) पक्के ठाऊक आहे. त्यामुळे तुपकरांना सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडी त्यांच्या स्वत:साठी बुलढाण्याची जागा सोडणार आहे. मात्र तुपकर सहकाऱ्यांचे काय? यावर अडून बसले आहेत.
चिन्हावर होणार चर्चा
रविकांत तुपकर यांनी शिवसेनेच्या मशाल या चिन्हावर निवडणूक लढवावी अशी शिवसेनेची इच्छा आहे. अर्थात अशी कोणतीही ऑफर अद्याप अधिकृतपणे शिवसेनेकडून तुपकर यांना देण्यात आलेली नाही. इतकेच नव्हे तर त्यांनी चिन्हावर निवडणूक लढविण्यापूर्वी शिवसेनेत प्रवेश करावा, असेही सांगण्यात येत आहे.
सध्या तुपकर हे स्वतंत्रपणे काम करीत आहेत. शेतकऱ्यांसाठी ते आंदोलन करतात. त्यामुळे कोणत्याही पक्षात गेल्यास आंदोलन करण्यापूर्वी संबंधित पक्षश्रेष्ठींची परवानगी त्यांना घ्यावी लागणार आहे. तुपकर यांनी महायुती आणि महाविकास आघाडी असे दोन्हीही पर्याय खुले ठेवले आहेत. परंतु यापैकी कोणत्याही पर्यायाची निवड करताना ते शेतकऱ्यांसाठी असलेली चळवळ संपणार नाही, याची काळजी घेत आहे.
तुपकर उघडपणे बोलत नसले तरी त्यांना कोणत्याही एका राजकीय पक्षाची गुलामगिरी नको आहे. त्यांना त्यांचे स्वतंत्र अस्तित्व आणि शेतकरी चळवळ टिकवून ठेवायची आहे. त्यामुळेच आचारसंहिता लागू झाल्यानंतरही त्यांनी अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. रविकांत तुपकर यांच्यासह त्यांच्या पत्नी अॅड. शर्वरी तुपकर या देखील विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.
Assembly Election : बावनकुळेंचं होणार तरी काय? उमेदवारी मिळणार की राज्यच फिरणार?
जनसंपर्क दांडगा
बुलढाणा जिल्ह्यातील तुपकर दाम्पत्याचा शेतकरी आणि ग्रामीण भागाशी असलेला जनसंपर्क दांडगा आहे. बुलढाणा जिल्ह्यात शहरीपेक्षा ग्रामीण मतदारांची संख्या जास्त आहे. 13 तालुक्यांमध्ये हा जिल्हा विखुरला आहे. त्यामुळे या जिल्ह्यात शेतकरी हाच निर्णायक फॅक्टर आहे. अशात तुपकर यांनी अनेक वर्ष केवळ शेतकऱ्यांसाठीच आंदोलन करीत ही नाळ पकडून ठेवली आहे. लोकसभा निवडणुकीतील मतांची गोळाबेरीज पाहता, त्यांना महाविकास आघाडी सोबतच घेईलच हे निश्चित मानले जात आहे. मात्र पक्षप्रवेशाचा निर्णय तुपकर घेणार नाही, हे देखील तितकेच खरं असल्याचं सांगण्यात येत आहे.