Ravikant Tupkar : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या मुंबईतील आंदोलनाच्या दणक्यामुळे अवकाळी पाऊस आणि गारपिटीची मदत मंजूर झाली होती. ही मदत अखेर निवडणुकीच्या तोंडावर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रविकांत तुपकरांच्या मुंबईतील मंत्रालय ताबा आंदोलनाच्या वेळी या मदतीसंदर्भातचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथिगृहावर झालेल्या बैठकीत दिले होते. तसेच अधिवेशनातही त्यांनी यासंदर्भात घोषणा केली होती. मात्र याचे श्रेय घेण्यासाठी ही मदत निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असे रविकांत तुपकर यांनी गेल्या महिन्यातच सांगितले होते. आता झालेही नेमके तसेच. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होत आहे.
ही मदत मिळण्यासाठी कुणी संघर्ष केला, हे शेतकरी आणि जनता विसरले नाहीत, अशा प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून उमटत आहेत. दुष्काळ, अतिवृष्टी आणि गारपिटीची मदत मिळावी, यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी वारंवार आंदोलने केलेली आहेत. एल्गार मोर्चानंतर मुंबईतील मंत्रालय ताबा आंदोलनादरम्यान 29 नोव्हेंबर 2023 रोजी सह्याद्री अतिथिगृहावर झालेल्या बैठकीत सोयाबीन-कापूस दरवाढ यासह दुष्काळ, अवकाळी व गारपिटीची मदत यासह मागण्या त्यांनी आक्रमकपणे मांडल्या होत्या.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळ, अवकाळी व गारपिटीच्या मदतीसंदर्भात शब्द दिला होता व त्यासंदर्भातील सूतोवाचही त्यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केले होते. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील गारपीट व अवकाळी पावसाने बाधित असलेल्या 2 लाख 76 हजार 575 शेतकऱ्यांना 220 कोटी 34 लाख रुपयांची मदत मंजूर झाली होती. परंतु त्याचे श्रेय रविकांत तुपकर आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जाईल म्हणून ही मदत तातडीने जमा न करता निवडणुकीच्या तोंडावर जमा केली जाईल, असे रविकांत तुपकर यांनी यापूर्वीच सांगितले होते, अखेर त्यानुसारच, मदतीची ही रक्कम निवडणुकीच्या तोंडावरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे.
जमा होत असलेल्या मदतीसाठी रविकांत तुपकर व शेतकऱ्यांनी केलेली आंदोलने जनता विसरली नाही. गारपीट व अवकाळीची नुकसान भरपाई ऐन निवडणुकीच्या काळातच जमा होईल आणि त्याचे श्रेय सत्ताधारी लोकप्रतिनिधी घेण्यासाठी पुढे धावतील, अशी भविष्यवाणी रविकांत तुपकर यांनी धाडजवळील सावळी येथे झालेल्या जाहीर सभेत केली होती आणि त्यांनी केलेली ही भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली आहे. अवकाळी व गारपिटीच्या नुकसान भरपाईची 2 लाख 76 हजार 575 शेतकऱ्यांना 220 कोटी 34 लाख रुपयांची मंजूर झालेली मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.