महाराष्ट्र

Ravikant Tupkar : राजू शेट्टी यांच्याबद्दल काय बोलून गेले रविकांत तुपकर

Raju Shetti : एका शेतकरी नेत्याने का व्यक्त केली दुसऱ्या नेत्याबद्दल नाराजी?

Buldhana News : राजू शेट्टी हे माझे गुरु नाहीत. ज्येष्ठ शेतकरी येते शरद जोशी हेच माझे गुरु आहेत. बुलढाण्यातील युवा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रविकांत तुपकर शेतकरी चळवळीत कार्यरत आहेत. अशात त्यांनी आपल्याला गुरूस्थानी कोण आहे, हे स्पष्टच करून टाकले आहे. सोमवार (ता. 18) सायंकाळी  रविकांत तुपकरांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, राजू शेट्टी माझे गुरु नाहीत. शरद जोशी (Sharad Joshi) माझे खरे गुरु आहेत. ‘मी कॉलेजमध्ये असताना त्यांच्यासोबत काम करीत होतो. जेव्हा राजू शेट्टी वेगळे झाले. शरद जोशींपासून राजू शेट्टी वेगळे झाल्याने आपण शेट्टी यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली. असे असले तरी शेट्टी नव्हे तर माझे गुरु हे शरद जोशीच आहेत, असे तुपकर म्हणाले. राजू शेट्टी यांनी स्वतःपुरता महाविकास आघाडीकडे पाठिंबा मागितला आहे. त्यांनी जे माध्यमांकडे सांगितले की मला हातकणंगलेमध्ये पाठिंबा द्या, तिकडे राज्यात आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो, या भूमिकेशी आम्ही सहमत नाही, असे स्पष्ट मत रविकांत तुपकर यांनी व्यक्त केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटना वाढविण्यासाठी आम्ही घरावर तुळशीपत्र ठेवले व संघटना वाढविली, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांसाठी काम सुरू केले. पण कालांतराने त्यांच्यात वितुष्ट येत गेले. येवढे की आता तुपकर यांनी स्वाभिमानी हा शब्दही आपल्या नावापुढे लावणे बंद केले आहे. फक्त शेतकरी नेते हाच उल्लेख ते करतात. तुपकर हे शेट्टींचे शिष्य मानले जात होते. पण आता तुपकरांनी त्यांचे गुरुत्व नाकारले आहे.

काय म्हणाले तुपकर शेट्टींबद्दल?

आतापर्यंत लोकप्रतिनिधींनी शेतकरी आणि बेरोजगार युवकांची वाट लावण्याचे काम केले आहे. त्यामुळे सर्वच अस्वस्थ आहेत. अशा परिस्थितीत आपल्यासाठी सभागृहात लढणारा हक्काचा माणूस म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील लोक माझ्याकडे बघत आहेत. त्यामुळे ही निवडणूक आता माझी एकट्याची राहिलेली नसून आता लोकांची निवडणूक झाली आहे. त्यामुळेच लोक स्वतः वर्गणी करून ही निवडणूक लढत आहेत, असेही तुपकर म्हणाले. राजू शेट्टी हे प्रत्येक पंचवार्षिक मध्ये स्वतःपुरता पाठिंबा मागायचा व आघाडी करायची आणि आम्हाला तयारी करायला लावायची. पण जेव्हा निवडणूक व्हायची, तेव्हा आम्हासारख्यांना तयारी करूनसुद्धा थांबायला लावायचे. हे नेहमीच होत आले आहे. त्यामुळे आता मात्र यावेळेस आम्ही बुलढाणा जिल्ह्यातून ही निवडणूक जनतेच्या आग्राहास्तर लढवणार आहोत. माझ्या निर्णयामुळे जिल्ह्याची राजकीय समीकरणे बदलली आहेत. या निवडणुकीत माझ्याशीच दिग्गजांची फाईट राहील व ही निवडणूकही जिंकणार, असा विश्वास रविकांत तुपकर यांनी बोलून दाखविला.

error: Content is protected !!