महाराष्ट्र

Buldhana : शेतकरी नेत्याला तडिपारीची नोटीस!

Farmer : डॉ. ज्ञानेश्वर टालेंवर कारवाईची तयारी?; नागरिकांमध्ये संताप

Ravikant Tupkar : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत प्रस्थापितांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यामुळे शेतकरी नेते डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्यावर कारवाईची तयारी सुरू झाली आहे. निवडणूक संपताच सूडसत्र सुरू झाल्याची संतप्त भावना बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झाली आहे. शेतकरी चळवळीत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे त्यांचे सहकारी शेतकरी नेते डॉ. ज्ञानेश्वर टाले यांना बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडिपार का करण्यात येऊ नये, अशी नोटीस पोलीस प्रशासनाने बजावली आहे.

प्रश्नांवर लढा

डॉ. टाले गेल्या अनेक वर्षांपासून शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर लढा देत आहेत. त्यांच्या लढ्यामुळे आजवर अनेक शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळाला आहे. त्यामुळे डॉ. टाले यांच्यावर होवू घातलेल्या कारवाईमुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. एकीकडे चोर, दरोडेखोर खुलेआम फिरत असतांना शेतकर्‍यांसाठी लढणार्‍याला मात्र तडिपारीची नोटीस नोटीस दिली जात असल्याने जनमत संतप्त झाले आहे. डॉ. टाले यांच्यानंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनाही राज्यातील फडणवीस सरकार तडिपार करणार का? अशा संतप्त भावनाही शेतकरी चळवळीतून व्यक्त होत आहेत.

राजकीय बदला घेण्यासाठीच डॉ. टाले यांना नोटीस दिल्याची प्रतिक्रिया शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी व्यक्त केली आहे. डॉ. ज्ञानेश्वर टाले हे मेहकर तालुक्यातील माझे अत्यंत जवळचे सहकारी आहेत. शेतकर्‍यांच्या चळवळीत ते अनेक वर्षांपासून माझ्यासोबत ताकदीने काम करतात. माझ्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी मेहकर विधानसभा मतदारसंघात अतिशय ताकदीने माझ्या प्रचाराची व नियोजनाची धुरा सांभाळली होती. विद्यमान खासदारांच्या तोडीस तोड मते मला मेहकर विधानसभेत पडली, हे त्यांच्या व सहकार्‍यांच्या परिश्रमांचे फलित आहे. डॉ. टाले यांच्यावर चोरी, दरोड्यासारखे गुन्हे दाखल नसून, केवळ चळवळीच्या पार्श्वभूमीवरील गुन्हे दाखल आहेत, असे तुपकर म्हणाले.

आम्ही घाबरणार नाही – रविकांत तुपकर

अनेकदा खोटे गुन्हे सत्ताधार्‍यांनी दाखल केले आहेत. त्यात अतिरेक म्हणून ऑक्टोबर महिन्यातील नोटीस त्यांना पोलिसांनी काल दिली. जेणेकरून त्यांना बाजू मांडण्यास वेळ मिळायला नको. पण माझ्या सहकार्‍यांना अशा कितीही नोटिसा दिल्या तरी आम्ही त्याला घाबरत नाही. तुम्ही आम्हाला तडिपार करा नाहीतर फासावर लटकवा, आमची सत्याची लढाई थांबणार नाही. महाराष्ट्राची पूर्ण संघटना व आम्ही डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत, अशी प्रतिक्रिया रविकांत तुपकरांनी दिली आहे.

सोयाबीन, कापूस दरवाढ, पीकविमा व इतर शेतकरी हिताच्या मागण्या घेऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर व त्यांचे सहकारी हे आक्रमक आंदोलन करून सरकारला सळो की पळो करून सोडतात, व शेतकर्‍यांच्या पदरात दोन पैसे पाडून देत असतात. त्यामुळे तुपकरांसह त्यांच्या सर्वच सहकार्‍यांवर गुन्हे दाखल आहेत. रविकांत तुपकरांची जंत्रीदेखील पोलिसांकडे तयार आहे. त्यामुळे डॉ. टाले यांच्यानंतर राज्यात पुन्हा सत्तेवर आलेले देवेंद्र फडणवीस सरकार हे रविकांत तुपकरांनादेखील बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातून हद्दपार करणार का? असा संतप्त सवालही शेतकरी चळवळीतून उपस्थित केला जात आहे.

Nitin Gadkari : गडकरींना आठवला सत्तरच्या दशकातील हॉलीवूड सिनेमा

तडिपार करा नाहीतर फासावर चढवा’

शेतकरी चळवळीत शेतकर्‍यांचे प्रश्न घेऊन रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली मी व माझे सहकारी 12 वर्षांपासून मेहकर परिसरात काम करीत आहे. शेतकर्‍यांसाठी विविध प्रश्नावर आम्ही अनेक वेळा आंदोलने केली, लाठ्या-काठ्या खाल्या, माझ्यावर जे गुन्हे आहेत ते आंदोलनातील व राजकीय आकासामुळे आहे. काही खोटे गुन्हे सत्ताधार्‍यांनी दबाव टाकून माझ्यावर दाखल केले आहेत. मी लढणारा माणूस आहे, अशा नोटीसला मी भीत नाही, मला तडिपार करा, नाहीतर फासावर चढवा शेतकर्‍यांसाठी मी लढतच राहील, अशी प्रतिक्रिया डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी दिली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!