Farmer Gopal Pohre : जिल्ह्यात सततच्या पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या खिशात पैसा नाही. आधीच तोट्यात चाललेली शेती आणि आता परतीचा पाऊस बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणत असल्याचं चित्र आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची अक्षरश: दैना केली आहे. अशात आता अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सर्वच स्तरातून केली जात आहे. राजकीय नेत्यांनीही तशी मागणी केली आहे. त्याचवेळी अकोल्यातील उरळ येथील शेतकरी गोपाल पोहरे यांनी केलेल्या समाधी आंदोलनाची राज्यभर चर्चा झालीय.
राज्यात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. याचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेली पिकं वाया गेलीत. अशा स्थितीत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली जात आहे. त्याचबरोबर विविध शेतकरी संघटनांसह विरोधी पक्षांनी देखील ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे.
यावर्षी सुरुवातीला जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. मात्र, त्यानंतर जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस झाला, याचा मोठा फटका शेती पिकांना बसला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाने थैमान घातलं. त्यामध्ये उरली सुरली पिकं वाया गेली. त्यामुळं राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे.
अकोला जिल्ह्यातही ही मागणी लावून धरण्यात येत आहे. विरोधी पक्षांकडून ही मागणी करण्यात येत आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. तर दुसरीकडे 2 ऑक्टोबर रोजी एका शेतकऱ्याने स्वतःला जमिनीत गाडून घेत समाधी आंदोलन केले आहे.
लक्ष वेधण्यासाठी आंदोलन!
अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्याने स्वतःला जमिनीत गाडून घेत अनोखं आंदोलन केले. 2024 च्या जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अकोला जिल्हासह बाळापुर आणि तेल्हारा तालुक्यात संततधार पाऊस झाल्यामुळे सोयाबीन, कपाशी पिकांसह अन्य पिकांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल होतं. आर्थिक मदत शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नसल्याचा आरोप बाळापुर तालुक्यातील जोगलखेड येथे गोपाल पोहरे या शेतकऱ्याने केला आहे.
अकोला जिल्हा तात्काळ “ओला दुष्काळ” जाहीर करावा. शेतकऱ्यांना कुठलेही नियम निकष न लावता सरसकट कर्जमाफी करण्यात यावी. 100 टक्के पिक विम्याचा लाभ तात्काळ कुठलेही नियम निकष न लावता देण्यात यावा. 2020 मध्ये मंजूर झालेला खरीप हंगामाचा बाळापूर तालुक्यातील 18 हजार शेतकऱ्यांचा पिक विमा तात्काळ देण्यात यावा. मागील वर्षीचा रब्बी हंगामाचा पिक विमा कंपनीला देण्यास बाध्य करावे या प्रमुख मागण्यासाठी समाधी आंदोलन पुकारलं. यावेळी शेतकऱ्यांना स्वतःला जमिनीत गाडून घेतलं.
निवडणुकीपूर्वी मदत मिळेल का!
लवकरच राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. त्यापूर्वी लवकरच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात आचारसंहिता लागण्यापूर्वी शेतकऱ्यांना पीक विम्याची मदत मिळावी अशी मागणी आहे. तर दुसरीकडे ओला दुष्काळ जाहीर करावी अशी देखील मागणी केली जात आहे. कारण निवडणूका लागण्यापूर्वी मदत न मिळाल्यास व निवडणूक लागल्यास शेतकऱ्यांचा वाली कोण असा प्रश्न उपस्थित होणार आहे.