New Controversy : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेत. अकोल्यात आमदार मिटकरींची गाडी मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडली. त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या राड्यात मध्ये मनसे पदाधिकारी जय मालोकार यांचाही समावेश होता. जय मालोकार यांचा गाडी फोडल्यानंतर घटनेच्या दिवशी मृत्यू झाला. आता जय मालोकारच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.
धक्कादायक गोष्टी समोर
जय मालोकारच्या शवविच्छेदन अहवालात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. जय मालोकारचा जबर मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचं कारण शवविच्छेदन अहवालात उघड झालं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्ण्यातील पुरस्थिती नंतर टीका केली होती. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना सुपरीबाज म्हणत त्यांच्यावर प्रतिहल्ला केला. त्यामुळे राज्यभर मनसैनिक आक्रमक झाले होते.
नाटकीय घटनाक्रम
अकोल्यात मनसे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे यांची पत्रकार परिषद सुरू असताना आमदार अमोल मिटकरी विश्रामगृहावर पोहोचले. ही माहिती मिळताच आमदार मिटकरींच्या गाडीला मनसेकडून लक्ष्य करण्यात आलं. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी मिटकरींच्या गाडीची तोडफोड केली. त्यानंतर आमदार मिटकरींच्या तक्रारीवरून मनसैनिकांविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलिसांनी गुन्हा नोंदविला. मात्र या प्रकरणाला त्यावेळी वेगळं वळण लागलं. गाडीवरील हल्लाप्रकरणात सहभागी जय मालोकारचा त्याच दिवशी सायंकाळी मृत्यू झाला. जयचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. त्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे यांनी जय मालोकार यांच्या कुटुंबीयांची भेटही घेतली. नंतर राज ठाकरेही जयच्या परिवाराला भेटून गेले.
MNS Vs NCP : मिटकरींची कार फोडणाऱ्यांपैकी जय मालोकारचा मृत्यू
जबर मारहाण
जयच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका सांगितलं जातं होते. अशात शवविच्छेदन (Post Mortem Report) अहवालात धक्कादायक कारण पुढे आले आहे. जयला जबर मारहाण झाली. त्याच्या शरीरावर जखमा आढळल्या. त्याच्या पाठीवर, छातीवर, डोक्यावर आणि मानेवर जबर मारहाणीच्या खुणा आढळल्या. छातीच्या चार ते पाच बरगड्यांमध्ये फ्रॅक्चर आढळले. डोक्यालाही गंभीर दुखापत झाल्याचे आढळले. पोस्टमार्टम करताना डॉक्टरांना जयच्या मेंदूवर मोठ्या प्रमाणात सूज आढळली. त्यामुळे मेंदूचे वजन वाढल्याचे निष्पन्न झाले. मानेवर जबर मारहाणीमुळे त्याच्या मज्जातंतूना गंभीर इजा झाली. त्यामुळे ‘न्युरोजनिक शॉक’मुळे मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद आहे. त्यामुळे याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जयचे भाऊ विजय मालोकार यांनी केली आहे.