शरद येवले
Lok Sabha 2024 : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील मतटक्का यावेळी घसरला आहे. वाशीम विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वाधिक मतदार असलेल्या 30 गावांत ही घट झाली आहे. त्याचा सत्ताधाऱ्यांना फटका बसणार का, याबाचत तर्कवितर्क लावले जात आहेत. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात सरासरी 62.87 टक्के मतदान झाले.या तुलनेत वाशीम विधानसभा मतदार संघाची टक्केवारी घसरली. येथे 60.56 टक्के मतदान झाले.
वाशीम विधानसभा मतदार संघात दोन शहरे येतात. यातील 70 हजार 603 मतदारांपैकी 36 हजार 837 जणांनी मतदान केले. टक्केवारी 52.17आहे. मंगरूळपीर शहरात 27 हजार 199 मतदारांपैकी 15 हजार 542 म्हणजे 57.14 टक्के मतदान झाले. शहरी भागांत 52 हजार 379 मतदान झाले आहे. तेवढेच मतदान सर्वाधिक मतदार असलेल्या सुमारे 30 गावांत झाले. ही संख्या 52 हजार 384 आहे. मोठ्या शहरांप्रमाणे मोठ्या गावांमध्येसुद्धा मतदानाचा टक्का घसरला आहे.
फटका कोणाला?
घसरलेल्या टक्केवारीचा परिणाम राज्यातील सत्ताधारी गटाच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रत्यक्ष मतमोजणी नंतरच खरे काय ते पुढे येईल. वाशीम विधानसभा मतदारसंघात वाशीम व मंगरूळपीर शहर आहे. ग्रामीण भागात मोठी गावे आहेत. ज्या गावातील मतदानाचा कल कोणत्या उमेदवाराच्या बाजूने जास्त गेला, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. 10 हजार 279 मतदार असलेल्या वाशिम तालुक्यातील
अनसिंग गावात 5 हजार 908 मतदान झाले. 57.48 ही एकूण मतदानची टक्केवारी आहे. येथे मतदानाचा टक्का घसरला आहे.
मंगरूळपीर तालुक्यातील शेलू बाजार येथे 4 हजार 250 मतदारांपैकी 2 हजार 662 मतदान झाले. म्हणजे 62.63 टक्के मतदान झाले. येथेही टक्का घसरला. वाशिम तालुक्यातील तोंडगाव येथे 4 हजार 112 मतदारापैकी 2 हजार 250 मतदान झाले. हे अवघे 54.72 टक्के मतदान आहे. मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा येथे 3 हजार 386 मतदार आहेत. त्यापैकी 1 हजार 886 मतदान झाले. ही टक्केवारी 57.83 आहे. केकत उमरा (ता. वाशिम) येथे 2 हजार 988 पैकी 1 हजार 728 जणांनी मतदान केले. येथे 57.83 टक्के मतदान झाले. हा आकडाही कमी आहे.
वारा जहागीर (ता. वाशिम) येथे 1 हजार 851, उकळी पेन (ता. वाशिम) 1 हजार 781, पेडगावात 1 हजार 550 मतदान झाले. ही येथे मोठी घसरण सावरगाव जिरे, कवठाळ (ता. मंगरुळपीर) 1 हजार 597, वारला (ता. वाशिम) येथे 1 हजार 301 आणि दाभा येथे 1 हजार 278 मतदान झाले. पिंपळगाव दंडे येथे 1 हजार 237 जणांनी मतदान केले. अशीच आकडेवारी अनेक गावांबाबत आहे.
नाराजी वाढली
शेतमालाचा मुद्दा, ग्रामीण जीवनमान, ओबीसी आणि मराठा आरक्षण हे यंदा नाराजीचे विषय होते. ग्रामीण भागात घरकुलाचा निधी कमी पडला. आयात केलेला उमेदवार हे देखील महत्वाचे कारण ठरले. याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर पडला. कमी मतदानाचा परिणाम प्रस्थापितांच्या विरोधात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.