Political News : दोन दिवसांपूर्वी एकमेकांवर व्यक्तिगत आरोप करणारे महाराष्ट्राचे आजी-माजी गृहमंत्री शुक्रवारी (दि.२) एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले. देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख यांचे एका व्यासपीठावर येणे सध्या राज्यभरात सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. पण दोघांनी एकमेकांना साधा नमस्कारही केला नाही, हे विशेष.
नागपूर जिल्ह्यातील झिल्पा, भोरगड आणि घाटपेंढरी या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी (दि.२) अॉनलाईन पद्धतीने पार पडला. येथील सुरेश भट सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी झिल्पा आणि भोरगड हे दोन प्राथमिक आरोग्य केंद्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघात आहेत. त्यामुळे त्यांचीही कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.
अनिल देशमुख यांच्यावर उद्धव व आदित्य ठाकरे यांच्याविरोधात खोटे आरोप करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता, असा दावा श्याम मानव यांनी केला होता. त्याला दुजोरा देत दबाव टाकणारा नेता तत्कालिन विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस होते, असा खळबळजनक खुलासा केला. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं.
देवेंद्र फडणवीस यांनी काऊंटर अटॅक करीत देशमुखांच्या विरोधात माझ्याकडे पुरावे असल्याचा दावा केला. पेन ड्राईव्हमध्ये माझ्याकडे अॉडियो-व्हिज्युअल्स असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर माझ्याकडेही पेन ड्राईव्ह असल्याचे देशमुखांनी म्हटले. या वादात इतरही नेते पडले. पण दोन दिवसांपूर्वी एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करणारे नेते आज एकाच व्यासपीठावर आले. त्यामुळे सभागृहात बसलेल्या प्रेक्षकवर्गाला देखील मोठी उत्सुकता होती. मात्र दोघांनी ना एकमेकांकडे बघितले, ना एकमेकांना नमस्कार केला.
इतर नेत्यांसोबत हास्यविनोद
या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख एकमेकांसोबत बोलले नाहीत. पण देशमुख मात्र इतर नेत्यांसोबत हास्यविनोदात रमलेले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार आशिष जयस्वाल यांच्यासोबत ते गप्पा मारण्यात व्यस्त होते.
आरोग्य केंद्रांचा फायदा होणार
नागरिकांना आरोग्य केंद्रावर दूर जावं लागत होतं. आता निश्चितपणे आरोग्य केंद्रांचा फायदा होणार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. काम सोपे व्हावे म्हणून खनिज निधीतून मोबाईल देण्यात येत आहे. डेटा नोंदी, रेकॉर्ड ठेवण सोपी होईल. अपडेट ठेऊन कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल. यादृष्टीने 1900 आशा सेविकांना मोबाईल वाटप करण्यात येत आहे. आशा सेविकांच्या मानधनात देखील वाढ झाली आहे. या महिन्यापासून वाढीव मानधन मिळणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी मोबाईल रिचार्जचा खर्च सरकार देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दवाखाना आपल्या दारी
‘दवाखाना आपल्या दारी’ या योजनेंतर्गत वाहन सुरू केले आहे. 2 लाख 67 हजार 549 लोकांना त्याचा लाभ मिळाला आहे, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये चॅरिटी बेड यापूर्वी होत नव्हते. पण आता डायनॅमिक व्यवस्था करून चॅरिटी निधी देने, बेड उपलब्ध असणे, याची माहिती देऊन गरजूंचे 40 लाखांपर्यंतचे ऑपरेशन करून देण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.