महाराष्ट्र

RSS : निवडणुकीपूर्वीच्या विजयादशमी उत्सवाकडे सर्वांचे लक्ष

Mohan Bhagwat : सरसंघचालकांच्या भाषणातून यंदा काय बाहेर पडणार?

Vijayadashami Utsav : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशाच्या राजकारणातील योगदान अविभाज्य आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने संघाकडे पाहिजे तसे लक्ष दिले नाही. चुकीचा कित्ता भाजप गिरवित गेली. अनेक ठिकाणी हेकेखारी झाली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजप तोंडावर आपटली. विदर्भात तर भाजपची अवस्था प्रचंड वाईट झाली. अशात भाजपचे पुन्हा एकदा ‘संघम् शरणम् गच्छामी’ सुरू झाले आहे. भाजपचे जुने नेते आणि कार्यकर्ते जवळ करण्यात येत आहे. या सगळ्यांमध्ये सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यंदाच्या विजयादशमी उत्सवात काय बोलतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

नवरात्रानंतर संघाकडून विजयादशमी उत्सवाचे आयोजन केले जाते. नागपुरात हा कार्यक्रम होतो. यंदा 12 ऑक्टोबरला रेशीमबाग मैदानावर संघाचा पारंपरिक विजयादशमी उत्सव होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सगळेच नेते यंदा झाडून विजयादशमी उत्सवात दिसणार आहे. त्याला कारणही तसेच आहे. लवकरच महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर संघाची नाराजी नको, यासाठी नेते सावधगिरी बाळगत आहे.

भाषणावर लक्ष

विजयादशमी उत्सवात दरवर्षी वेगवेगळ्या पाहुण्यांना निमंत्रित करण्यात येते. यंदा भारतीय अंतरिक अनुसंधान संघटनचे (ISRO) माजी अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन यांचा निमंत्रित करण्यात आले आहे. 75 वर्षीय राधाकृष्णन यांच्या नेतृत्वात भारताने सर्वप्रथम मंगलयान मोहिम हाती घेतली होती. त्यांनी जीएसएलव्हीसाठी प्रथमच स्वदेशी क्रायोनेजिक इंजिन तयार केले. राधाकृष्णन यांच्यामुळेच भारताचे ‘मिशन मंगलयान’ यशस्वी झाले. सेवानिवृत्तीनंतरही राधाकृष्णन विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करीत आहेत. त्यामुळे त्यांना संघाने विजयादशमी उत्सवातील प्रमुख अतिथी पदाचा सन्मान दिला आहे. संघाच्या या पारंपरिक उत्सवात प्रमुख आकर्षण असते ते सरसंघचालकांचे भाषण.

यंदाच्या उत्सवात डॉ. मोहन भागवत कोणत्या मुद्द्यावर बोलणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे. भाजपसोबतच देशातील सर्वच राजकीय पक्षांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दखलपात्र संस्था आहे. त्यामुळे संघाच्या हालचालीवर भारतासह विदेशातील सरकारचेही लक्ष असते. देश-विदेशातील अनेक गुप्तचर संस्था संघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून असतात. अशात महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे संघ प्रमुखांकडून भाजपला कोणता कानमंत्र दिला जातो, याची उत्सुकता आहे.

Ganesh Mante : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा मोठा प्लॅन

सारं सत्तेसाठी

भाजपच्या विजयात संघाचा मोठा वाटा आहे. संघाचे स्वयंसेवक भाजपच्या विजयासाठी जीवतोड काम करतात. परंतु मध्यंतरीच्या काळात भाजपच्या अनेक नेत्यांकडून संघाच्या स्वयंसेवकांना व प्रचारकांना ‘साइड ट्रॅक’ करण्यात आले. काही ठिकाणी प्रचारकांना अपमानास्पद वागणूक मिळाली. त्यामुळे संघाने नाराजीही व्यक्त केली होती. सत्ता असली काय किंवा नसली काय संघाला कोणताही फरक पडत नाही, असे विधान त्यामुळेच संघाच्या वरिष्ठांना करण्याची वेळ आली. मात्र भाजपा सत्ता असली आणि नसली तर मोठा फरक पडतो. त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक जिंकण्याचे मोठे आव्हान भाजपपुढे आहे.

हरीयाणा आणि जम्मु काश्मिरात भाजपची सत्ता येणार नाही, असा दावा सर्वेक्षणातून करण्यात येत आहे. मतदारांना आता हिंदुत्वाच्या पलीकडे जात विकास हवा आहे. उच्च शिक्षणाच्या सोयी-सुविधा, रोजगार, मोठे उद्योग, स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य, आरक्षणात बदल, गुणवत्तेच्या आधारावर आरक्षण हे तरुणाईला हवे आहे. कोविड महासाथीनंतर भारतातील अनेक उद्योगांची कंबर मोडली आहे. आता कोविड निघून गेला आहे. परंतु त्याने आणलेल्या आर्थिक भूकंपातून अद्यापही अनेक उद्योग सावरलेले नाहीत. त्यांना आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. सर्वसामान्य लोकांवरही कर्जाचा डोंगर कायम आहे.

Sudhir Mungantiwar : वनमंत्री झाले गोंडवाना विद्यापीठातून डॉक्टर

मध्यमवर्गीयांचे प्रयत्न

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी (ता. सहा) नागपुरात भाजपच्या महाजनसंपर्क अभियानाला सुरुवात केली. त्यावेळी महिलांनी त्यांच्या समोर मध्यमवर्गीयांचे प्रश्न मांडले. घरगुती वापराचा गॅस, विजेचे दर, महाग झालेले इंधन, खाद्यतेल, किराण्याच्या वस्तू, जीवनावश्यक वस्तू आणि औषधांचा मुद्दा अनेकांनी उपस्थित केला. रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य, माफक दरात शिक्षण, मूलभूत सुविधा असे अनेक प्रश्न अद्यापही कायम आहे. मात्र आताही सरकारी यंत्रणा आणि नेते गोमातेला राज्यमातेचा दर्जा देणे, गावांची नावं बदलणे, हिंदुत्वावर बोलणे केवळ अशाच मुद्द्यांवर बोलत आहेत.

मध्यमवर्गीय आणि तरुणाईला आता हे नको आहे. 2014 मध्ये तरुणाईने प्रचंड उत्साहाने घराबाहेर निघत मतदान केले. अभुतपूर्व असाच हा प्रतिसाद होता. मात्र आता हा प्रतिसाद कमी होत आहे. मतदानाचा टक्क घसरत आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही या मुद्द्यावर भाजपचे कान टोचणे गरजेचे आहे. क्षेत्र कोणतेही असो शब्द दिल्यानंतर जो शब्द पूर्ण करतो, त्याचा ‘इमेज’ इतरांपेक्षा वेगळी असते. एकदा या व्यक्तीने शब्द दिला म्हणजे काय झालं असा लोकांचा ठाम विश्वास असतो. हा विश्वास भाजपला लोकांमध्ये तयार करावा लागणार आहे. त्यामुळे भाजपचे मूळ ज्या संघाच्या वटवृक्षाच्या तळाशी आहे, तेथुन ज्ञानाचे हे डोस मिळावे अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!